२ वाट्या आवळ्याचा रस, ५ वाट्या तिळाचे तेल एकत्र करावे. त्यात ७/८ लवंगा, ७/८ वेलची, ७/८ सोनचाफ्याची फुले, २/३ गुलाब फुलांच्या पाकळ्या, ४ चमचे चंदन पावडर, ४ चमचे जटामासी पावडर, २ चमचे कपूर काचरी, ५/६ जास्वंदाची फुले, २ संत्र्यांच्या साली (ओल्या किंवा सुक्या) एकत्र वाटून गोळा कालवावा व मिश्रण मंदाग्नीवर उकळत ठेवावे. यातील पाण्याचा अंश जळून गेल्यावर तेल वस्त्रगाळ करून केसांना लावण्यासाठी वापरावे. केसांचा काळेपणा टिकून राहण्यासाठी केसांना चमक येण्यासाठी तसेच केसातील कोंडा व केस गळतीवर हे तेल उपयुक्त होते.
अमलक्यादि तेल प्रकार ३ :
पाव किलो आवळकाठी १ लिटर पाण्यात रात्री भिजत घालावी. सकाळी आवळकाठी उपसून बारीक वाटून भिजत घातलेल्या पाण्यात कालवून त्यात अर्धा किलो तिळाचे तेल घालावे व मिश्रण मंदाग्नीवर उकळत ठेवावे. उकळल्यावर फक्त तेल शिल्लक राहिल्यावर तेल गाळून घ्यावे. नंतर या तेलात २ संत्र्यांची साले व ठेचलेली ८/१० जास्वंदिची फुले घालून तेल भरणीत भरून दीड महिना भरणी उन्हात ठेवावी. नंतर तेल गाळून केसांना लावण्यासाठी वापरावे. अमलक्यादि तेल प्रकार २ प्रमाणेच हे तेल उपयोगी पडते.
करंजतेल प्रकार १ :
बाजारात करंज तेल मिळते त्या तेलात कापूर व लिंबाचा रस घालून मिश्रण चांगले हलवून रोज आंघोळीपूर्वी अर्धा तास डोक्यातील खवड्यावर चोळून लावावे. डोके धुण्यासाठी जंतूनाशक साबणाचा वापर करावा.
करंजतेल प्रकार २ :
करंज तेलात कापूर मिसळून तेल आठवड्यातून २/३ वेळा केसांच्या मुळाशी रात्री चोळून लावावे. सकाळी डोके स्वच्छ धुवावे. हे तेल कोंडा प्रतिबंधक म्हणून उपयुक्त होते.
कोरफड सिद्ध तेल :
कोरफडीचा गर खलून पातळसर करावा. नंतर हा गर तिळाच्या तेलात घालून तेल मंदाग्नीवर उकळवावे. तेल चांगले उकळले गेल्यावर वस्त्रगाळ करून केसांसाठी वापरावे. डोक्याला मसाज करण्यासाठी व केसांना पोषक म्हणून हे तेल उपयोगी पडते.
निलगिरी तेल :
निलगिरीची ओली पाने वाटून गोळा तिळाच्या तेलात कालवून तेल सिद्ध करून गाळून केसांना रात्री लावल्याने उवा-लिखांचा त्रास कमी होतो. बाजारात तयार मिळणारे निलगिरी तेल खोबरेल तेलात घालून मिश्र तेल रात्री केसांना लावावे. या मिश्रणाने देखील उवा-लिखांचा त्रास कमी होतो.
जायपत्रीचे तेल :
जायपत्री वाटून खोबरेल तेलात घालून तेलाची भरणी २१ दिवस उन्हात ठेवावी. त्यानंतर तेल गाळून घेऊन केसांना लावण्यासाठी वापरावे. केस गळतीवर प्रतिबंधात्मक म्हणून हे तेल उपयुक्त पडते.
जास्वंदिचे तेल :
अर्धा किलो तिळाच्या तेलात जास्वंदिची १०/१२ फुले वाटून घालावीत व तेलाला चांगली उकळी द्यावी. तेलाला लालसर रंग आल्यावर तेल गाळून घ्यावे. हे तेल केस गळतीवर प्रतिबंधात्मक म्हणून उपयोगी पडते.
जोजोबा तेल :
कोणत्याही केसवर्धक तेलात जोजोबा तेलाचे काही थेंब टाकावेत. या मिश्र तेल वापराने त्याची उपयुक्तता वाढते शिवाय केसांना चमक येते.
तैलार्क केशरंजना :
खोबरेल तेलात हा तैलार्क मिसळून केसांसाठी हे मिश्र तेल वापरावे. हे केस केस गळती, उवा-लिखांवर परिणामकारक होते.
तैलार्क बलवर्धिनी:
तैलार्क केशरंजना प्रमाणेच हा तैलार्क वापरावा. याचा उपयोग देखील तैलार्क केशरंजनासारखाच होतो.
लिंबादि तेल :
लिंबू, संत्रे, मोसंबी यांच्या ओल्या किंवा सुक्या साली, जास्वंदाची फुले व माका एकत्र वाटून गोळा तिळाच्या तेलात कालवून तेल सिद्ध करून गाळून केसांना नेहमी लावल्यास केस गळतीस प्रतिबंध होतो व केसांना चांगली तकाकी येते.
पारिजातकाच्या बियांचे तेल :
पारिजातकाच्या बिया पाण्यात वाटून गोळा तिळाच्या तेलात कालवून तेल सिद्ध करून केसांना गाळून केसांना नियमितपणे लावल्यास केस गळतीला प्रतिबंध होतो.
ब्राह्मी तेल :
ब्राह्मीचा ताजा पाला वाटून गोळा तिळाच्या तेलात कालवून तेल सिद्ध करून केसांना लावण्यास वापरल्याने डोक्याला थंडावा येऊन केस गळतीस प्रतिबंध होतो.
माक्याचे तेल प्रकार २ :
दोन भाग तिळाचे तेल, १ भाग नारळाचे दूध, अर्धा भाग माक्याचा अंगरस एकत्र करून कढईत (लोखंडी) उकळत ठेवावे. एक उकळी आल्यावर त्यात कपूर सुगंधी व वाळा पावडर घालून त्यातील पाण्याचा अंश आटेपर्यंत मिश्रण उकळवावे. फक्त तेल शिल्लक राहिल्यावर वस्त्रगाळ करून घ्यावे. हे हिरवट काळपट तेल केसांना रोज लावल्याने केसांच्या बाबतीतल्या अनेक तक्रारी कमी होतात.
मेंदीचे तेल :
मेंदीचा हिरवा पाला वाटून गोळा तिळाच्या तेलात कालवून तेल सिद्ध करून गाळून केसांना लावण्यासाठी नेहमी वापरल्यास केस गळतीला आळा बसतो.
रोझमेरी तेल :
केसवर्धनासाठी रोझमेरी तेलाचे काही थेंब खोबरेल तेलात खलून तेल नेहमी केसांना लावण्यासाठी वापरावे.
लिंबाचे तेल :
समभाग तिळाचे तेल व लिंबाचा रस एकत्र करून तेल सिद्ध करून गाळून केसांना लावण्यासाठी वापरल्याने केसांतील कोंडा व कंड (खाज) कमी होण्यास मदत होते.
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला वरील दिलेली माहिती आवडली असेल हि माहिती आपल्या मित्रमंडळीमध्ये share करायला विसरू नका. कृपया कोणतेही उपाय करण्याआधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वैधानिक सूचना नक्कीच वाचा.