केसांना रात्री कोणतेही तेल लावल्यानंतर सकाळी केस धुणे (नहाण करणे) आवश्यक असते. खरे तर केस रोज धुणे जरुरीचे आहे. पण आजच्या घाईगडबडीच्या दिवसात रोज केस धुणे शक्य होत नाही. पण आठवड्यातून किमान दोन वेळा तरी केस धुण्यासाठी जरूर सवय काढावी. केस धुण्यासाठी आज विविध शांपूंचा वापर केला जातो. त्यांत वनौषधीयुक्त शांपूऐवजी रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेले शांपू व साबण यांचीच जास्त भर व बोलबाला (जाहिरात) असल्याने त्याच शांपूचा जास्त वापर केला जाऊन आपण आपल्या हातानेच केसांची दुर्दशा करून घेतो. ते टाळण्यासाठी केस धुण्यासाठीच्या विविध वनौषधी संचांची माहिती करून देत आहे. त्यांचा ३/४ महिने सातत्याने उपयोग केल्यास चांगले परिणाम दिसावयास सुरवात होते.
केस धुण्यासाठी वनौषधी-संच
संच नं. १ : १ चमचा शिकेकाई पावडर, १ चमचा आवळा पावडर, १ चमचा नागरमोथा चूर्ण, १ चमचा संत्र्याच्या सुक्या सालीचे चूर्ण, १ लिटर पाण्यात कालवून उकळवून गाळून घ्यावे. पाणी कोमट झाल्यावर त्याने केस धुवावेत.
संच नं. २ : ज्यांचे केस तेलकट आहेत अशांनी मुलतानी माती पातळसर कालवून त्याने आठवड्यातून २ वेळा केस धुवावेत.
संच नं. ३ : आवळकाठी चूर्ण, शिकेकाई पावडर प्रत्येकी १०० ग्रॅम, बावची, नागरमोथा, गव्हला काचरी यांची पावडर प्रत्येकी ५० ग्रॅम व चंदन पावडर आणि वाळा (कुटलेला) प्रत्येकी १० ग्रॅम यांचे मिश्रण तयार करावे. यातील ४/५ चमचे मिश्रण पुरेशा पाण्यात कालवून केसांना लावण्यासाठी वापरावे. याने केस मऊ व मोकळे होऊन केसांतील कोंड्याचे प्रमाण देखील कमी होते. केस जास्तच तेलकट असल्यास या मिश्रणात १०० ग्रॅम रिठयाची पावडर घालावी.
संच नं. ४ : १०० ग्रॅम शिकेकाई, ८० ग्रॅम मेथ्या, १५ ग्रॅम संत्र्याची साल, २० ग्रॅम लिंबाची साल, ५ ग्रॅम नागरमोथा, ५ ग्रॅम गव्हला काचरी, ५ ग्रॅम कपूर कचोरा यांच्या पावडरींचे एकत्र मिश्रण तयार करावे. यातील २/३ चमचे (अंदाजे १० ते १२ ग्रॅम) पावडर १ लिटर पाण्यात कालवून पाणी उकळवून, गाळून केस धुण्यासाठी वापरावी.
संच नं ५ : १० ग्रॅम शिकेकाई, २५ ग्रॅम रिठा, १० ग्रॅम बावची, १० ग्रॅम कुष्ठ, ५० ग्रॅम आवळा, १० ग्रॅम मेथी, १० ग्रॅम कपूर काचरी, १० ग्रॅम संत्र्याची साल, ५० ग्रॅम डाळींबाची पाने या सर्व औषधींची पावडर एकत्र करून यातील २ चमचे पावडर २/३ कप पाण्यात उकळवून, गाळून केस धुण्यासाठी वापरावी.
संच नं ६ : नहाण्यासाठी नुसतीच शिकेकाई वापरण्याऐवजी त्यात अमलकी व रिठा पावडर समप्रमाणात घालून त्यातील १/२ चमचे मिश्रण कोमट पाण्यात कालवून केसांना लावून अर्ध्या तासानंतर नहाण करावे.
केस धुण्यासाठीच्या संचाशिवाय काही औषधे :
➤ ३ भाग शिकेकाई पावडर व १ भाग लिंबाच्या वाळलेल्या सालींची पावडर पाण्यात कालवून केसांना लावण्यासाठी वापरावी. ➤ संत्र्याची फुले ठेचून त्याचा काढा तयार करून गाळून केस धुण्यासाठी वापरावी. ➤ १/१ भाग शिकेकाई पावडर, आवळ्याची पावडर किंवा संत्र्याच्या सुक्या सालीची पावडर व २ भाग रिठ्याची पावडर यांचे मिश्रण करून ठेवावे. यातील १ चमचा मिश्रण १ कप पाण्यात कालवून केस धुण्यासाठी वापरावे. ➤ मेथीच्या पानांचा रस, आवळ्याचा रस यांच्या मिश्रणात मेथ्यांची पावडर कालवून केस धुण्यासाठी वापरावी. ➤ बेसन पीठात थोडा सोडा घालून मिश्रण पाण्यात कालवून केस धुण्यासाठी वापरावे. ➤ 'केशिका' हे तयार औषधी मिश्रण केस धुण्यासाठी वापरावे. ➤ १ कप पाणी व अर्धा कप दूध एकत्र करून केस धुण्यासाठी वापरावे. ➤ केस धुतल्यावर केसांना कंडिशनर म्हणून १ चमचा व्हिनेगार व १ चमचा ग्लिसरीन यांचे मिश्रण लावावे. ➤ नहाण करण्यापूर्वी केसाचा गुंता काढावा.
➤ शांपू शांपूचे निर्माते उपयुक्तता नसलेल्या अनेक गोष्टींबाबत शांपूची अवास्तव जाहिरात करीत असतात, पण त्यांच्या जाहिरीतींतील फोलपणा नजरेस यावा म्हणून आपल्या माहितीसाठी काही खुलासा करीत आहे. अर्थात हा खुलासा शुध्द वनौषधीयुक्त शांपू बाबत नसून रासायनिक शांपूबाबत आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी. ➤ कोणत्याही शांपूमुळे डोक्यातील कोंडा कमी होत नाही. ➤ शांपूमुळे केसांचे पोषण होते ही निखालस खोटी गोष्ट आहे. त्यातील प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स मुळापर्यंत पोहोचू शकत नाहीत. मृत केसांना वरून लावलेला शांपू केसांचे पोषण कसे करू शकेल ? ➤ केसांच्या मुळांच्या रचनेवर केसांची वाढ अवलंबून असते. केसांना शांपू लावल्याने केस लांब व दाट होतात हा फसवा युक्तिवाद आहे. ➤ शांपू लावल्याने केस सफेद होण्याचे थांबते हे सर्वस्वी खोटे आहे. त्यासाठी केस सफेद होण्यामागची कारणे दूर होणे आवश्यक आहे. तसेच केसांच्या मुळाखाली रंगनिर्मिती करणारे जे कलरसेल असतात त्यांची कार्यनिर्मिती थंडावल्यावरच केस हळूहळू सफेद होऊ लागतात. या कलरसेलचे कार्य पुन्हा प्रभावीपणे सुरू करणे कोणत्याही शाम्पूला शक्य नाही.
वास्तविक केसांची मुळे स्वच्छ करून केसांचा पोत चांगला राखण्याचे कार्य हर्बल शांपू करतो. तसेच केसांची अतिरिक्त तेलकटी कमी करण्याचे कार्य शांपू करतो. शांपूच्या वापराने केसांच्या इतर समस्या निर्माण होत नाहीत.
पण शांपूमध्ये रासायनिक द्रव्यांचे अधिक्य असल्यास केस राठ होऊन निस्तेज होतात. अनेक देशी व परदेशी शांपूत अॅसिडचा वापर मोठ्या प्रमाणावर केलेला असतो. अशा शांपूच्या वापराने केस अकाली पिकणे, केस मध्येच तुटणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.
थोडक्यात कोणताही शांपू वापरा असे म्हणणे योग्य ठरणार नाही. ज्यांना शांपूची निवड करणे अशक्य वाटत असेल अशांनी वर नमूद केलेल्या संचापैकी एकाचा केसांसाठी वापर करावा.
रासायनिक शांपूमुळे उद्भवणाऱ्या केसांच्या समस्या : केसांसाठी रसायनयुक्त प्रसाधनांचा सातत्याने वापर करण्याने केस व त्याखालील त्वचा कायम स्वरूपी खराब होते. शिवाय वरचेवर पोटाच्या तक्रारी उद्भवतात, कायमची जीवघेणी डोकेदुखी सुरू होते.
शांपूच्या दुष्परिणामावर उपाय - ➤ त्रिफळा चूर्ण, जेष्ठमध चूर्ण व गुळवेल पावडर ही औषधे समप्रमाणात एकत्र करावीत. यातील ४ चमचे मिश्रणाचा अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा तयार करून गाळून रोज रात्री झोपण्यापूर्वी एकवेळा असा हा काढा आठवडाभर घ्यावा. ➤ वरील काढा एक आठवडा घेतल्यानंतर रक्तशुध्दीसाठी जेष्ठमध, कडुनिंबाची पाने व कोरफड गर यांचा काढा तयार करून एक आठवडा रात्रीच्यावेळी जेवण झाल्यावर झोपण्यापूर्वी घ्यावा. ➤ ५० मिली खोबरेल तेलात १० मिली जोजोबा तेल व प्रत्येकी ५ थेंब जिरेनियम तेल, लव्हेंडर तेल, चंदन तेल घालून मिश्रण चांगले हालवून केसांना लावण्यासाठी वापरावे. ➤ शांपू वापरण्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शांपू लावण्याअगोदर दूध, दही, लिंबाचा रस व आवळापावडर यांचे पातळसर मिश्रण तयार करून केसांना लावावे. थोड्या वेळानंतर केस धुवावेत. मग शांपू लावावा. शांपू लावून नहाण झाल्यानंतर केस चहाच्या पाण्याने किंवा लिंबूपाण्याने धुवावेत.
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला वरील दिलेली माहिती आवडली असेल हि माहिती आपल्या मित्रमंडळीमध्ये share करायला विसरू नका. कृपया कोणतेही उपाय करण्याआधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वैधानिक सूचना नक्कीच वाचा.