पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली
पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली
चांदची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली...।।धृ।।
सफेद साडीवर सफेद कंचोळी
लेऊन आली गं गगनाची भोळी
ओवाळाया भीम सख्याला उतावळी ती झाली...।।१।।
करी घरी कोणी पुरणाची पोळी
गीत कुणी ओठी भीमाचे घोळी
फोटो पाशी बसून कोणी, म्हणे मिळाला वाली...।।२।।
असाच कैवारी मिळो पुन्हा कोणी
घुसळून देणारा तत्वाचे लोणी
असेच त्याचे गीत घुमावे, निळ्या आभाळा खाली...।।३।।
एक तुतारीने जागविले कोटी
एक ध्वजाखाली वागविले कोटी
मानवेचा दूत असावा असाच वैभवशाली...।।४।।
जमेल जनसागर ऐकाया गाणं
ऊठ बिगी वामन तुला तिथं जाणं
तुलाच घाली साद सकाळी, निळा नवा मखमाली...।।५।।