✏️ अनुक्रमणिका
१. केसांचे सर्वसाधारण आरोग्य
२. केसांचे प्रकार
३. केसांची सामान्य चिकित्सा
४. केस गळती
५. केसगळतीवर उपाय
६. केसांची वाढ होण्यासाठी
७. टक्कल
८. केेेस पिकणे
९. केसांसाठी कलप
१०. केसांचे नहाण
११. केसातील उवा लिखा
१२. केसातील कोंडा
१३. खवडा
१४. केसात चाई
१५. केसांची अनावश्यक वाढ
१६. काळी मेंदी
१७. प्रवासात घ्यावयाची केसांची काळजी
१८. केसांसाठी विविध तेले
केसांसाठी कलप :
केसांना खालील औषधींचा कलप करण्यासाठी उपयोग करावा.
कलप संच १ : मेंदीची पावडर व आवळकाठी पावडर एकत्र करून लोखंडी कढईत रात्रभर भिजत घालावी. सकाळी हे मिश्रण केसांना लावून तासाभराने केस धुवावेत.
कलप संच २ : मेंदीची पावडर, आवळकाठी पावडर समभाग घेऊन त्यात लिंबाचा रस व पुरेसे दही घालून चांगले एकजीव फेसून घेऊन केसांना लावावे व तासाभराने केस धुवावेत.
कलप संच ३ : आवळा १० ग्रॅम, बेहेडा १० ग्रॅम, बाहवा मगज २५ ग्रॅम यांच्या पावडरींच्या मिश्रणात एक ते दीड ग्रॅम लोहभस्म घालून मिश्रण चांगले एकजीव करून ठेवावे. त्यातील मिश्रण आवश्यकतेनुसार घेऊन रात्रभर लोखंडी कढईत भिजत घालावे. सकाळी तो गोळा केसांना लावावा. त्यानंतर तासाभराने केस धुवावेत.
कलप संच ४ : त्रिफळा चूर्ण, वाक्याचे चूर्ण, लोहभस्म आणि काळी माती या सर्व औषधींचा पाणी घालून लोखंडी कढईत खल करावा व रात्रभर त्याच कढईत ठेवून सकाळी मिश्रण केसांना लावावे. तासाभरानंतर केस स्वच्छ धुवावेत.
कलप संच ५ : साखर न घालता उकळलेल्या चहाच्या पाण्यात हाताला लावतो ती मेंदी घट्टसर भिजवून त्यात १ लिंबाचा रस व अंड्यातील फेसलेला सफेद बलक एकत्र खलून घालावा व केसांना लावावा. नंतर तासाभराने नहाण करावे.
कलप संच ६ : उत्पल कमळ बारीक वाटून घेऊन त्यात त्याच्या दुप्पट गाईचे दूध घालून मिश्रण चांगले कालवून घेऊन कोऱ्या मडक्यात भरून ठेवावे. मडक्याचे तोंड माती कपडा करून जमिनीत पुरून ठेवावे. एक महिन्यानंतर मडके बाहेर काढून वस्त्रगाळ करून मिश्रण केसांना लावण्यासाठी वापरावे. हे मिश्रण लावल्यानंतर तासाभराने स्नान करावे.
कलप संच ७ : एका भांड्यात ४ चमचे आवळकाठीची पावडर व १ चमचा मंडूर भस्म घेऊन त्यात साखर न घातलेले २ कप कडक चहाचे गाळलेले पाणी घालून वरील पावडरी भिजत घालाव्यात. २४ तास हे मिश्रण तसेच भांड्यात ठेवावे. फक्त दिवसातून २/३ वेळा हे मिश्रण हालवावे. २४ तासानंतर या मिश्रणाचा रंग पूर्णपणे काळा झालेला असेल. २४ तासानंतर हे मिश्रण फडक्यातून गाळून घेऊन त्यात ८ चमचे मेंदी पावडर, २ चमचे जास्वंदाच्या फुलांची पावडर, २ चमचे माका पावडर, २ चमचे मुलतानी माती व १० थेंब मोतिया रोशा तेल घालून पातळसर घोटून मिश्रण तयार करून २ तास मुरू द्यावे. २ तासानंतर वरील मिश्रण केसांना मुळापासून टोकाकडे असे ब्रशने लावावे. तासाभरानंतर नहाण करावे.
सूचना :
१) ज्यांना वरचेवर सर्दीचा त्रास होतो अशांनी हा संच वापरू नये. त्यातून वापरावयाचा झालाच तर मिश्रण गरम करून घेऊन त्या मिश्रणात २/३ थेंब निलगिरी तेल टाकावे.
२) ज्यांचे केस जास्त प्रमाणावर सफेद झालेले असतील अशांनी या संचातील आवळा पावडरीचे प्रमाण वाढवून मेंदीच्या पावडरीचे प्रमाण आवळा पावडरीच्या प्रमाणात कमी करावे.
३) या संचातील मिश्रण जास्तीत जास्त ५ वेळाच केसांसाठी वापरावे. प्रथम आठवड्यातून एकदा व नंतर १५ दिवसातून एकदा हे मिश्रण केसांना लावावे.
४) ज्या व्यक्ती नेहमी केसांसाठी रासायनिक डाय वापरतात अशांनी हे मिश्रण लावण्यापूर्वी केस स्वच्छ धुवावेत आणि नंतर हे मिश्रण लावावे.
कलप संच ८ : वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा जाणकार व्यक्तीच्या प्रत्यक्ष सहकार्याने खालील औषधींचा केसांना लावण्यासाठी उपचार करावा. माक्याचा रस, त्रिफळा चूर्ण, काळी माती व लोहभस्म यांच्या मिश्रणात उसाचा रस घालून कोऱ्या मडक्यांत भरून *माती कापड करून महिनाभर तसेच ठेवावे. त्यानंतर हे मिश्रण गाळून घेऊन केसांना लावण्यासाठी वापरावे. केसांना हे मिश्रण लावल्यानंतर तासाभराने केस धुवावेत.
कलप संच ९ : आवळकाठीचे चूर्ण व लोहकिट्ट चिनीमातीच्या भांड्यात २४ तास भिजत ठेवावे. त्यानंतर या मिश्रणाचा केसांना कलप करावा. रात्री कलप केल्यानंतर केस फडक्याने बांधून ठेवावेत. सकाळी रिठ्याच्या पाण्याने केस धुवावेत.
कलप संच १० : १ कप मेंदी पावडर, १/१ चमचा जास्वदीच्या फुलांची वाटलेली गोळी, कोरफडीचा गर, आवळा चूर्ण, बावची पावडर एकत्र करून त्यात पुरेसे पाणी घालून मिश्रण रात्रभर लोखंडी कढईत ठेवावे. सकाळी केस धुवून कोरडे केल्यावर केसांना या मिश्रणाचा कलप करावा.
केस अकाली पांढरे होणे
➤ ३ मासे त्रिफळा चूर्णात १ ते १ गुंज मण्डूर भस्म ( ब्राम्ही पावडर ) मिश्रण करून गरम पाण्याबरोबर घ्यावे.
➤ "आरोम्यं भास्करादिच्छेत" हा मंत्र म्हणून रोज सकाळी सूर्योदयाचे वेळेस १०८ सूर्य नमस्कार घालावे.
➤ सर्वसाधारणपणे केसांना रात्री तेल लावल्यानंतर दुसरे दिवशी केस धुणे आवश्यक असते. त्यासाठी खालील केशवर्धक औषधी पावडरींच्या मिश्रणाचा उपयोग करावा. याला केशवर्धक चूर्ण म्हणतात.
टिप : *मडक्याच्या तोंडावर कोरे फडके बांधून व ओल्या मातीचा जाडसर लेप करावा.