जन्मले भिमाईचे बाळ
जन्मले भीमाईचे बाळ। उठा गं उठा, दवंडी ही पिटा,
आज आनंद लुटा, सोनियाची आली सकाळ ।।धृ।।
बुध्दानंतर युध्दभूमीवर आला आज प्रकाश।
हा हा म्हणता ठरला आता दुष्ट रूढीचा विनाश।
काळोखाने केले काळे, निर्मळ झाले आभाळ...।।१।।
चला चला ग चला महूला जन्मा आला अरूण।
त्या अरूणाला करुणाघनाला पाहू डोळे भरून।
गोजिरवाना चिमणा तान्हा पाहू चला वेल्हाळ... ।।२।।
काल आम्हाला निर्दयतेने छळिले फार छळाने।
छेदा आता शीर छळाचे बाळ भीमाच्या बळाने।
बाळ नव्हे हा छळणारांचा आहे कर्दनकाळ...।।३।।
ज्यांना ज्यांना बाळ भीमाचे दर्शन आज घडले।
फळ पुत्राचे वामन जैसे पदरी त्यांच्या पडले।
माती महूची लावू भाळी उजळू आपुले भाळ... ।।४।।