तुझीच कमाई
तुझीच कमाई आहे गं भीमाई
कुणाचेच काही इथे कष्ट नाही ।।धृ।।
लाभले न जेथे प्यावयास पाणी
ज्ञानाची धारा अशा माळरानी
तुझ्याच प्रतापे आणलीस आई,
कुणाचेच काही ।।१।।
वाळून ज्यांची पाने गळली
घालून पाणी अशा फुलवेली
फुलवून गेली तूच ठाई ठाई,
कुणाचेच काही ।।२।।
सध्दम्म धेनु दिलीस दुधाळ
मिळे दूध आम्हा सदा सर्वकाळ
त्यातलीच आम्ही चाखतो मलाई,
कुणाचेच काही ।।३।।
कालचे रिकामे, आताचे निकामे
जगतात आई तुझीयाच नामे
इथे गीत वामन खरे तेच गाई,
कुणाचेच काही ।।४।।