मुजरेच केले रे
काल मुजरेच केले रे
माझ्या मेलेल्या बापाने
आज मुजरे मला करती
भीमाच्या प्रतापाने ।।धृ।।
गेली सारीच लाचारी
आज दिल्ली दरबारी
मला नेऊन बसविले
सात कोटीच्या बापाने ।।१।।
मला चांभार बनविले
एका काळ्या कसाबाने
का न कापावे मी त्याला
एक रापीच्या कापाने ।।२।।
होतो मातीत दडलेला
होतो मातीत पडलेला
माझे सोनेच केले रे
एका मोठ्या सराफाने ।।३।।
काल जातीच्या सापाला
ठेचले मी जरी वामन
काढला काढला रे फणा
येथे त्याच जातीच्या सापाने ।।४।।