![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEixLcNMNwMHBBnVHTr0HciXWAkqZJxNE9LPB3DldeP1itpNWsqHEXSn1tJfUUx-pWb3u4Oyg3cdPFf1B_fwrF_IurAdAZr2zt1qQCcuKm5xZqBLIQb6WjbQ9DyKByjgPTMI3GK02HDJcCLq830A_6QHwCZIfWWhlGDN6dFzNpSmxDIHPFmF-E0IZhT4Ew/s400/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%B9%E0%A5%80%20%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE_.webp)
चंदनाची ही चिता
थांबा थांबा जाळता का
चंदनाची ही चिता
पाहू द्या डोळा भरून मज
भीम हा माझा पिता ।।धृ।।
राहिले कोंदन हे केवळ
गळून पडला नीलमणि
चंद्रा वाचून काय शोभा
यायची तारांगणी
राहिले ना स्वर या कंठी
काय गावे संगीता
पाहू द्या डोळा भरून मज
भीम हा माझा पिता
थांबा थांबा ... ।।१।।
विश्व हे दीन दुःखितांचे
जाहले सुने सुने
एक भीमा वाचूनी वाटेल
जग सारे उणे
ही चिता विझणार नाही
केला जरी सागर हिता
पाहू द्या डोळा भरून मज
भीम हा माझा पिता
थांबा थांबा ... ।।२।।
तो जळत होता रं विसम
त्यास का अग्नि हवा
चंदनाला वाजवी कीर्ती
सुगंधित ही हवा
मन फुलासम त्याचे कोमल
त्यास सुमने अर्पिता
पाहू द्या डोळा भरून मज
भीम हा माझा पिता
थांबा थांबा ... ।।३।।
कालवंडून आज गेल्या
आशेच्या दाही दिशा
पोहोनी हीनदीन ह्रदयाचे
प्रतीक रडते निशा
आश्रू ढाळी भावना ही
हुंदका दे अस्मिता
पाहू द्या डोळा भरून मज
भीम हा माझा पिता
थांबा थांबा ... ।।४।।
या प्रशांताला अशांत
करीत असे आकांत हा
झोपू द्या निर्वाण पथिका
जाहला बहुश्रांत हा
नष्टविता का तया जो
ते कसे नव जीविता
पाहू द्या डोळा भरून मज
भीम हा माझा पिता
थांबा थांबा ... ।।५।।