मनाला मोडूनी
जीवनात पैज ना कधी, हरलीस तू रमा...
आदर्श माऊल्याप्रती, ठरलीस तू रमा
उदंड प्रेम आईचे देऊनी समाजा,
कीर्ती रूपाने या जगी उरलीस तू रमा
जीवनात धन्य झालो, मी रमा तुझ्यामुळे
तुळवीत काटे आलो, मी रमा तुझ्यामुळे
अर्ध्यात गेली सोडून झालो मी पोरका
परिहात आज न्हाहलो मी रमा तुझ्यामुळे.
मनाला मोडूनी, हे नाते तोडूनी..२
गेली का सोडूनी, तू रमा, तू रमा..२ ।।धृ।।
केला कसा या काळाने घात...२
अन अर्ध्यातच सुटला साथ
भासू दिली ना कमी कशाची मजला आयुष्यात
स्वतः धडपडली ग, कधी ना रडली ग
दिव्या सम जडली ग, तू रमा...।।१।।
आधार नाही तू गेल्या पाठी...२
क्षणातच तुटल्या रेशीम गाठी
मला वाटते जणू हरवली,
आंधळ्याची काठी
तू दुःख साहिले, सुख ना पाहिले
हे तन-मन वाहिले तू रमा...।।२।।
देऊ कसा मी धीर या मनाला...२
अर्थ ना उरला या जीवनाला
हृदय फाटले येता आठवण
तुझी क्षणाक्षणाला
शिलाची शीलवान, गुणाची गुणवान
तू माझा प्रिय प्राण तू रमा...।।३।।
तव स्वप्नाची स्फूर्ती करीन मी
हीन दीन समाजा उराशी धरीन मी
परमानंद आले मरण तर
हसुनी मरीन मी
तू खरी योगिनी, तू जीवन संगिनी
तू माझी अर्धांगिनी, तू रमा...।।४।।
मनाला मोडूनी, हे नाते तोडूनी
गेली का सोडूनी तू रमा, तू रमा..