त्या भीम माऊलीला, लाखात पाहिले मी
त्या भीम माऊलीला, लाखात पाहिले मी
जयगान माऊलीचे लाखात गाईले मी...।।धृ।।
नागांची नाग नगरी, दीक्षेस पात्र होती
तेथेच दोन रात्री , जाऊन राहिले मी... ।।१।।
एक फूल काळजाचे, एक फूल भावनांचे
एक फूल या मनाचे, लाखात वाहिले मी...।।२।।
गेली हजार वर्षे, नव्हता मनात हर्ष
म्हसनातल्या मनूचे, आघात साहिले मी...।।३।।
नरकातले जिणे ते, नरकात फेकले मी
बुध्दा तुझ्या शीलाच्या सिंधूत न्हाईले मी...।।४।।
वामन समान सारे, काळे गळून पडले
हृदयात पौर्णिमेचे, एक रोप लाविले मी..।।५।।