एक हिरा जन्मा आला
आले कोटी कोटी इथे, गेले कोटी कोटी
एक हिरा जन्मा आला माऊलीच्या पोटी... ..।।धृ।।
संस्कृतीचे बळी, गळी गुलामीची झोळी
गुलामाची झोळी, करी गुलामांची होळी
गुलामीची झोळी अशी पेटविण्यासाठी...।।१।।
होते अर्ध पोटी इथे, किती किती कोटी
ल्यावयास होती एका वितेची लंगोटी
त्याच कुडी फुलारली भिमाईची ओटी...।।२।।
केले त्याने बंड केले, मोकळे गुलाम
गुलामांना दाखविले गौतमाचे धाम
झाले त्याचे नावं इथे, कोट कोट ओठी...।।३।।
आंबेडकर नावं त्याचे आंबावडे गावं
कोटी कोटी दलितांचा तोच खरा राव
वामनच्या कोटी कोटी पूर्वजांच्या पाठी...।।४।।