जिवाला जिवाचं दान
जिवाला जिवाचं दान माझ्या भीमानं केलं
झिजवून जिवाचं रान माझ्या भीमानं केलं ।।धृ।।
साऱ्या महारामधी मॅट्रिक नव्हतं कुणी
यश घेऊन आली भीमाची लेखणी
असं अमृताचं पान, माझ्या भीमानं केलं ।।१।।
एका गरीबा घरी जन्माला येऊनं
तरी शिकावयाची जिद्द उरी ठेवून
अमेरिकेला प्रयाण, माझ्या भीमानं केलं ।।२।।
आला कोलंबियाहून पीएच.डी. होऊनं
दुजी विलायतेची बॅरिस्टरी घेऊन
त्याचच देशाला दान, माझ्या भीमानं केलं ।।३।।
शाळा कॉलेज काढली शिकली सारी मुलं
पाना शेजारी फुलली दरवळणारी फुलं
असं नवनिर्माण, माझ्या भीमानं केलं ।।४।।
आधी माणुसकीचा दिला आम्हाला धडा
मग प्रेत मनुचे पेटविले धडधडा
असं आम्हा बलवान, माझ्या भीमानं केलं ।।५।।
जात होऊन आमच्या पडली होती गळी
त्या सटवाईची आम्हीच भरली तळी
असं तिचं शिरकाण, माझ्या भीमानं केलं ।।६।।
राजदरबारी अशी केली कारगिरी
लोकशाहीचा तुरा लेऊन आपल्या शिरी
कायद्याचं कार्य महान, माझ्या भीमानं केलं ।।७।।
जरी जनता माझी वामनवानी खुळी
वाट चुकावयाची चिंता नाही मुळी
असं आम्हा सज्ञान, माझ्या भीमानं केलं ।।८।।