तो भारताचा वाली
तो भारताचा वाली, एकोणवीसशे छप्पन साली
त्या बोधीवृक्षाखाली आम्ही पाहिला
दीक्षा घेता मंगल काली, बोल बोलताना पाली,
त्या बोधी वृक्षाखाली आम्ही पाहिला ।।धृ।।
त्या सुंदर सोहळ्यासाठी। त्या नाग नदीच्या काठी
सत्धम्माच्या दरबारी। लोकांनी केली दाटी
जुनं तिथं बदलण्यासाठी
सात लाखाचा मेळावा। जमला असता भोवताली, त्या बोधी...।।१।।
ह्या भारत खंडामाजी। जन सृष्टी कष्टी माझी
ममतेची मानवतेची। द्या भाकर भाजी ताजी
होईना कुणीही राजी
मागणी पुरी ना झाली। जीवनाच्या अंतिम काली, त्या बोधी...।। २।।
सुख सावलीला जाता। माझा महान नेता
वदला जगाला आता। येथेच नमावा माथा
अवघ्या विश्वाची माता माय ममता जिथे मिळाली, अशा अभंग वैभवशाजी, त्या बोधी...।।३।।
शुभ श्रावस्तीचा वारा। नव भारत व्यापी सारा
अन् राजगृहाची कारा। उघडी मुक्ताच्या व्दारा
वामन तो भूजा तारा
पाहून म्हणे वैशाली। काल पहावयाला आली, त्या बोधी....।।४।।