स्वप्नात आला
घटनापती भीम दुबळ्याचा नेता दलितांचा पालन वाला
गं बाई स्वप्नात माझ्या आला वो, माझ्या
दाराकडे मोटार येता दुरुनच दिसला मला... || धृ।।
जशी का दुसरी बुध्दाची मूर्ती । धर्मसुधारक जालीम शक्ती
मिळतंया रुपडे उभे उभे ते सूर्याच्या तेजाला...।।१।।
ओळखला मी दलिताचा देव बाई । जाहीर ज्याचे दुनियेत नाव बाई
देहाची आरती केली जिवाची ज्योती, ओवाळीला मी त्याला... ।।२।।
गडबडीत तशीच उठले मी । आया-बायांना सांगत सुटले मी ।
बसलाय काय तुम्ही उठा उठा गं, जाऊ या दर्शनाला... ।।३।।
बाया पोरं आणि बापे हो, धावत सुटली जनताही भोळी ।
दुःख निवारता दाता बघाया, गावसारा गोळा झाला... ।।४।।
गजबजली ही घटकेत नगरी । जणू अवतरली इंद्रपुरी ।
अशी सभा भरली काय करता त्या इंद्राच्या दरबाराला... ।।५।।
जेव्हा का भीमदेव बोलायला लागले जी ।
टाळ्यांच्या गजराने आकाश जागले जी ।
जातीभेद मोडायची दिली आरोळी भिडली गगनाला... ।।।६।।
कळवळीचं भाषण झालं बाई, वामन कवीने लिहून ठेवलं हो ।
माणूसकीनं जग रं दलिता शेवटी हे सांगून गेला...।।७।।