पराक्रमाची कथा सांगती
पराक्रमाची कथा सांगती उत्तुंग डोंगरकडे
फक्त पायदळ सेना होती, माझ्या भीमाकडे... ।। धृ।।
भीम गर्जना करीत सारे, रणांगणी ठाकले
महाडच्या चवदार तळ्याचे पाणी आधी चाखले
अजून वाटे मनुस्मृतीची, आग नभाला भिडे...।।१।।
तशीच फिरली फौज फाकडी, नाशिक शहराकडे
काळ्या रामाभवती पडले, निर्धाराचे कडे
चकीत झाली गोदा वदली, नवल घडे केवढे...।।२।।
नवा नगारा झडे रणाला रंग वेगळा चढे
नवेच आता घडे, चालले मुक्तिमार्गाकडे
ज्ञान मंदिरा समोर केले सैनिक सारे खडे... ।।३।।
सिध्दार्थाचे नावं गाजले मुंबई नगरीमधी
वाहू लागली तिथून आता आनंदाची नदी
त्याच नदीचे पाणी प्याले साहेब झाले बडे... ।।४।।
बुध्दा नंतर फुले, फुलेंचा चेला आंबेडकर
क्रांति, क्रांति करीत फिरला अखंड भारतभर
ठायी ठायी असेच लढले मर्द गडी फाकडे... ।।५।।
घटनेचे मंदिर उभविले, वीर असा नरमणी
दिल्लीचा दरबार भरविते, भीमाची लेखणी
अशोक चक्रांकित तिरंगा, उंचावरती चढे... ।।६।।
अखेरचा संग्राम गाजला, नागपूर नगरीला
धम्मचक्र फिरविले भीमाने, धम्म दीनांना दिला
तिथेच त्याने मान झुकविली, गुरू गौतमा पुढे...।।७।।
पंचशीलाचा त्रिसरणाचा घुमू लागला ध्वनी
नवीन संजीवनी मिळाली, भीम तोषला मनी
मंगलवाणी तीच भीमाची अजून कानी पडे...।।८।।