पाहिला भीम आम्ही
वादळी वाऱ्यामधी तोफेच्या माऱ्यामधी
पाहिला भीम आम्ही रणी लढणाऱ्या मधी...।।धृ।।
महाड क्रांतिमधी दिलं मर्दाचं जिणं
आपल्या ओंजळीनं शिकवलं पाणी पिणं
पाहिला भीम तिथं तेजस्वी ताऱ्यामधी...।।१।।
पाहिला भीम आम्ही रामरथ ओढताना
पाहिला गुलामीची बेडी तोडताना
पाहिला गोदातीरी मार खाणाऱ्या मधी...।।२।।
पाहिला भीम आम्ही दिल्लीला भांडताना
दीन दुबळ्यांची तिथं बाजू मांडताना
पाहिला भीम आम्ही चढत्या पाऱ्यामधी...।।३।।
वामन भीम तुझा चंदनी हारामधी
पाहिला काल आम्ही बुध्दाच्या दारामधी
चांगल्या संस्कृतीचे दास होणाऱ्या मधी...।।४।।