निळी ही नगरी
निळी ही नगरी झाली निळ्या अभाळाखाली ।
डौलाने डोले जयभीम बोले निळा नवा मखमाली ।।धृ।।
आज आनंदाचा सण हर्षानं फुलवितो मन ।
सारे भीमरायाचे जन करी झेंड्याला वंदन ।
करून वंदन बोले हे जन निळाच आमचा वाली ।।१।।
या भीम जयंतीकडे निरखून पाहावे गडे ।
साऱ्या भूमीवर चहूकडे गगनात निळा फडफडे ।
आली निळा ही वसुंधराही निळच लेण ल्याली ।।२।।
जमलाय जनसागर जुळतील हे माझे कर ।
बोलून उठे अंतर हेच समतेचे आगर ।
समतेची ग्वाही निळा शिपाई निळंच लेणं घाली ।।३।।
ही वामनची लेखणी का दिसू नये देखणी ।
फेकून लक्तरे जुनी नेसून नवी पैठणी ।
चवदार तळी ही न्हाऊन आली अशी ही जय भीमवाली ।।४।।