निर्धार
काल निर्धार केला नराने ।
भीमराव रामजी आंबेडकराने ।
वर्णवादाचे ओझे न वाहील ।
जन्मा आलेले माझे घराने ।।धृ।।
नद्या नाले जगातील सारे ।
पाणी त्यांचे असो गोड खारे ।
जे जे येईल त्या ठाव देईल ।
ठरविले रे महासागराने ।।१।।
वामनाने आणि श्रीधराने ।
किसन फागु आणि कर्डकाने ।
लेखणीची पूजा काल केली ।
घेगडेच्याच कोमल कराने ।।२।।
आले कोटी जरी आज पोटी ।
सांग वामन कशाची कसोटी ।
श्रावणाची कि, लक्ष्मणाची
गाणी गावी इथे लेकराने ।।३।।