माय भीमाईला पाहिले
आम्ही माय भीमाईला पाहिले
फूल चरणी त्या जाऊन वाहिले ।।धृ।।
नाग नगरीत येऊन भीमाई
दीक्षा देणार कळताच बाई
गेले चालून तिथं पायी पायी
दीक्षा घेतली मी आनंदाने न्हाईले, फूल चरणी त्या...।।१।।
लाख बहिणी आणि भाऊबंद
हिन्दु धर्माचे तोडून बंध
बौध्द धम्माचा लुटता आनंद
दोन रात मीही त्याच्या संग राहिले, फूल चरणी त्या...।।२।।
खाण ज्ञानाची मिळता महान
माझी जन्माची हरली तहान
आता संसारी उरली न वाण
जुने सोडूनिया गीत नवे गाईले, फूल चरणी त्या...।।३।।
क्रूर काळाच्या दुनियेत वामन
कोटी बाळांचे करताना पालन
माय माझीच झिजली रे कणकण
आम्हा साठी हे सारे जिने साहिले, फूल चरणीत्या...।।४।।