भीम कीर्तीचा डंका
थोर करणीने साऱ्या जगी गाजला
भीम कीर्तीचा डंका जगी वाजला
प्रेम मातेचे दिधले तुला नी मला
त्याच मूर्तीचा डंका जगी वाजला ।।धृ।।
श्वास समजून ज्यांनी तुला गांजले
करणी भीमाची पाहून ते लाजले
शर्थ शौर्याची लावून सदा झुंजला
त्याच शर्थिचा डंका जगी वाजला ।।१।।
शिष्य ज्योतिचा गणला उभ्या भारती
बुध्द नौकेचा ठरला महासारथी
मार्ग ममतेचा दावून पुन्हा आजला
ह्याच धरतीचा डंका जगी वाजला ।।२।।
जीर्ण झालेले सोडून जुने झोपडे
आणिले आज वामन विकासाकडे
ज्ञान धम्माचा प्याला तुला पाजला
ध्येयपूर्तिचा डंका जगी वाजला ।।३।।