भीम ज्योत
अशी भीमज्योत जळे
तिमीर ढळे, पळे
दूर अशी भीमज्योत जळे ।।धृ।।
कोटरी आज नवे जळती ज्ञान दिवे
कुठे महान कुठे अगदी सान दिवे,
मना मनास असा नवा प्रकाश मिळे
नवा प्रकाश मिळे धरणीला आकाश मिळे
अशी भीमज्योती जळे... .।।१।।
माकडी माळ असो अथवा गाळ असो
रान खडकाळ असो काळे आभाळ असो,
असो अंधार आम्हा आमची वाट कळे
आमुची वाट कळे ना कुणाचा पाय चळे
अशी भीमज्योत जळे...।।२।।
शिकून जाय पुढे लावितो टाय पुढे
सुखी संसार करी विद्या माय पुढे,
असेच आज इथे चाखती गोड फळे
चाखती गोड फळे भीमा मुळे कोट कुळे
अशी भीमज्योत जळे... ।।३।।
वामन वाट असो अवघड घाट असो
दरी अफाट असो झाडी दाट असो,
चुकून पाय वळे तरी अपघात टळे
तरी अपघात काळे काळे सारे पळे
दूर अशी भीमज्योत जळे...।।४।।