कीर्तीला मृत्यु नाही
नको म्हणू नाही, भीम आहे सर्व ठाई
आहे त्याची कीर्ती कीर्तीला मृत्यु नाही ।।धृ।।
जाहला देहांत, तरीही जिवंत, दिसेल तुला माझा भीम भगवंत
जनहीत ज्यात, असे मूर्तिमंत
अमर आहेत त्याचे अनमोल ग्रंथ
दिव्य दृष्टी येई, तू वाचुनिया पाही ।।१।।
राज भुवनाला मंत्री गणाला, देतो आहे भीम माझा कायद्याचा सल्ला
जिवे कष्टविला, देह नष्टविला
कोण बरे घटनेमधुनी नष्टविल त्याला
भीम नष्ट होईल, तर मेली लोकशाही ।।२।।
नव्या जीवनात, साहसी मनात, संचरे भीम अवघ्या बौध्द जनात,
दुःखी दीनात, दीन रूदनात
तुझ्या माझ्या काळजाच्या आतल्या खणात
आहे किंवा नाही तू चाचपुनी पाही ।।३।।
बड़े बड़े धेंड खेड्यात अखंड, छळतात रे बौध्दांना नादान गुंड
तिथेही प्रचंड ठोकूनी दंड
शक्ति भीमाची देई शत्रूशी तोंड
अन्यास होई भीम तेथे धाव घेई ।।४।।
ऐक्याच्या रुपात, ध्येयाच्या दीपात, जळताहे भीम माझा होऊनी वात
मानवी धम्मात, समत सुमनात
दुःखितांच्या शोषितांच्या वसे उत्थानात
जिथे भीम नाही, तो मुक्ति मार्ग नाही ।।५।।
त्यागी तरुणात करुणा घनात, युगंधर भीम माझा सर्व सद्गुणात
इथे सुजनात, लोक शिक्षणात
माझ्या गायनात आणि कोटी नयनात
वामनलाही तोच चालवित राही ।।६।।