कानात काल माझ्या
कानात काल माझ्या
माझे मरण म्हणाले
तनमन तुलाच माझे
आले शरण म्हणाले ।।धृ।।
कोटी उपाशीपोटी
धरलेस तूच पोटी
झाले तुझ्या कुळाचे, शुध्दीकरण म्हणाले ।।१।।
जळणे दिव्याप्रमाणे
नाही तुझे फुकाचे
गौतम तुझ्यात आहे, मज त्रिशरण म्हणाले ।।२।।
जीवनकथा गुरुची
गाथा लिहून होता
सरला प्रवास आता, माझे चरण म्हणाले ।।३।।
ओटीत गौतमाच्या
घालून सात कोटी
चल झोप शांत आता, माझे सरण म्हणाले ।।४।।
वामनसमान माझ्या
चिमण्या चिल्यापिल्यांनो
तारील मी तुम्हाला, एकीकरण म्हणाले ।।५।।