चांदण्याची छाया कापराची काया
चांदण्याची छाया, कापराची काया ।
माऊलीची माया होता माझा भीमराया... ।।धृ।।
चोचीतला चारा देत होता सारा ।
आईचा ऊबारा देत होता सारा ।
भिमाई परी चिल्यापिल्यावरी
पंख पांघराया होता, माझा भीमराया… ।।१।।
बोलतात सारे विकासाची भाषा ।
लोपली निराशा आता लोपली निराशा ।
सात कोटीमधी - विकासाच्या आधी ।
विकासाचा पाया होता माझा भीमराया... ।।२।।
झाले नवे नेते मलाईचे धनी ।
वामनाच्या मनी येती जुन्या आठवणी ।
झुंज दिली खरी राम कुंडा वरी ।
दगड गोटे खाया होता माझा भीमराया... ।।३।।