जयभीम माझा सन्मित्र
जयभीम माझा सन्मित्र, जयभीम माझे गणगोत्र
संजीवनी जयभीम मंत्र, जयभीम दिनांचा सारथी
क्रांती पथी चालवी सदा तोच तोच आम्हाला भारती
जयभीम माझा सन्मित्र ।।धृ।।
नऊ कोटींच्या मूक मनांची वाणी इथे जयभीम ठरला
रक्त रूपाने बौध्द जनांच्या नसानसातून संचरला
जीवन आमुचे जयाकडे, ने प्रेरक जयभीम शक्ति क्रांति पथी ।।१।।
अज्ञानाचा अंधकार तो कायमचा आता दडला
प्रकाशला जयभीम रवि, रंग नवा भू ला चढला
नवीन दृष्टी, नवीन सृष्टी जन सारे स्वीकारती क्रांति पथी ।।२।।
जयभीम माझा मार्ग यशाचा, जयभीम चैतन्य स्फूर्ति
विद्या, विनय, शील अशी मांगल्याची त्रिमूर्ती
जयभीम म्हणजे नेतृत्वाचा ज्ञानकोश धरती वरती क्रांती पधी ।।३।।
जयभीम माझा भले कुणाला रुचो अथवा नावडो
येई वदनी तसाच माझ्या कानीही जयभीम पडो
जयभीमचा जयघोष ऐकता बाहू माझे स्फूरती क्रांति पथी ।।४।।