भीमा तुझ्या महुला
भीमा तुझ्या महुला जाऊन काल आलो
तू जन्मल्या ठिकाणी राहून काल आलो ।।धृ।।
तू रांगलास जेथे तेथेच मान झुकली
ती धूळ मी कपाळी लावून काल आलो ।।१॥।
आई तुझी भिमाई सातारलाच गेली
तेथेही दोन अश्रृ वाहून काल आलो ।।२।।
जाऊन दूर देशी तू आणली शिदोरी
मी त्यातलीच थोडी खाऊन काल आलो ।।३।।
दिल्लीतला खजिना तू वाटणार होता
तेथे तुझेच पाणी दावून काल आलो ।।४॥
दीक्षा भूमी सभोती हर्षाने दाटलेली
नागांची नागनगरी पाहन काल आलो ।।५ ॥
देह जाळणार होते, मी टाळणार होतो
वामनसवेच तेथे धावून काल आलो ।।६।।