जयंती
एक ताज्या नव्या विक्रमाची ।
ही जयंती भीमाची भीमाची ।।धृ।।
हीच माझी तिजोरी धनाची ।
ही क्रांती दीनांच्या मनाची ।
थोरवीची ऋणाची श्रमाची ।
ही जयंती भीमाची भीमाची ।।१।।
घेरले काल काळ्या तमाने ।
हेरले तेच माझ्या भीमाने ।
दूर सेना पिटाळी तमाची ।
ही जयंती भीमाची भीमाची ।।२।।
साथ झाली रमा थोर भार्या ।
साथ दिधली तिने थोर कार्या ।
कीर्ती सांगे भीमाची रमाची ।
ही जयंती भीमाची भीमाची ।।३।।
बुध्दवाणी कबीराची वाणी ।
ज्योतिबाची नवी मेजवाणी ।
वर्णी लावी क्रमाने क्रमाची ।
ही जयंती भीमाची भीमाची ।।४।।
हीच वामन तुझे गीत झाली ।
ही वामन तुझे गीत झाली ।
कास धरली हीने गौतमाची ।
ही जयंती भीमाची भीमाची ।।५।।