चालवेना मार्ग आले फोडे पाया
चालवेना मार्ग आले फोडे पाया
येगं भीमाई उचलून घ्याया... ।।धृ।।
आई तुझ्या छायेत वाढला हा पिंड
मायेच्या पंखाखाली राहिलो अखंड
कशी एकाएकी तोडलीस माया... ।।१।।
आजवरी आई तू कष्ट साहुनिया
क्रमलास मार्ग मजला कटी घेऊनिया
धजलिस कैसी आता सोडूनी जाया...।।२।।
पोळतात पाय माझे तापलेली वाट
लागुनिया ठेच माझे रक्ताळले बोट
तोल जाऊ पाहे माझा मला हात द्याया...।।३।।
समता द्रोही द्रुष्ट करंटे
विखुरले मार्गी माझ्या होऊनिया काटे
बोचतात पायी माझ्या लागले छळाया... ।।४।।
कुणी साथ ना दे, कुणी हात ना दे
उचलुनी मजला आपल्या कुशीमध्ये ना घे
थकलाय वामन आता शिणली ही काया... ।।५।।