भीम वाणी
भीम वाणी पडली माझ्या कानी
तीच वाणी ठरली माझी गाणी ।।धृ।।
बलवान गडी बलदंड । जणु पोलादाचा पिंड
हलविण्यास भारत खंड । ठोकुनी आपुला दंड
भीम गर्जना करीत होता महाडच्या मैदानी ।।१।।
बांधून शिदोरी पाठी । करी खुळखुळणारी काठी
पाण्याच्या झगड्यासाठी । चवदार तळ्याच्या काठी
खवळून उठले, जयभीमवाले पिऊ म्हणाले पाणी ।।२।।
ती महाडाची ललकारी । देशात पसरली सारी
उपसून जुन्या तलवारी । या म्हणे एकदा दारी
एक हाकेने पेटून उठले कोटी कोटी प्राणी ।।३।।
ह्या भीमपथाचे जाता । चिंता न जिवाची आता
गाऊन भीमाची गाथा । सुखवावी जनता माता
गाता गाता वामनवानी जळो बिचारी ज्वानी ।।४।।