नांगराचा फाळ
जमीन आमची नांगरणारा नांगराचा फाळ तो
भीमाआईचा बाळ होता, भीमाआईचा बाळ तो ।।धृ।।
जात आम्हाला जाळीत होती तीच आम्हाला टाळीत होती
जात मनुची जाळीत होता, धगधगणारा जाळ तो...।।१।।
शिजू दिली ना ताजीताजी मिळू दिली ना भाकर भाजी
पाहत होता नीच नरांची, सारी टाळाटाळ तो...।।२।।
सारी धरणी पिकण्यासाठी पिकण्यासाठी टिकण्यासाठी
घामाने तो भिजवीत होता, सारा सारा माळ तो...।।३।।
उभा पिंपळाखाली होता तोच आमुचा वाली होता
आमच्या चिलापिलांचा, करणारा सांभाळ तो... ।।४।।
नामी संधी चालून आली वरचे मडके आले खाली
ओढीत होता खाली खाली, सारा वरचा ताळ तो...।।५।।
गटार गंगेमधले पाणी उपसित होता वामनवानी
फुले सारखा उपसित होता, सारा सारा गाळ तो... ।।६।।