भीमाची कोटी मुलं
भीमाची कोटी मुलं, कोटी मुलं, कोटी मुलं वाहती
त्याच्या पदी कोटी फुलं, कोटी फुलं ।।धृ।।
कायदा केला त्यानं, दिल्ली दरबारी बसून ।
लोकशाहीचा असा, नवानिर्माता असून ।
तरी ना भारतानं मानाचं एक पान दिलं...।।१।।
देशाच्या दलिताला भीमाने हाक दिली ।
जातीच्या विषामुळे कोणी ना साथ दिली ।
मान देतात त्याला आजही त्याचीच पिलं...।।२।।
मांगाला महाराला भंगी चांभाराला ।
केलं शिक्षण खुलं, रामोशी वडाराला ।
तरी महारांनी फक्त भीमाचं कौतुक केलं...।।३।।
सात कोटीला खुलं त्यान आव्हान केलं ।
हिंदु धर्मामधी नाही तुमचं भलं ।
फक्त महारांनी धर्मत्यागाचं नोटीस दिलं...।।४।।
भीमाचा लोकलढा होता देशाला धडा ।
परी ना कुणी बडा झाला पाठीशी खडा ।
राहिली छायेपरी पाठीशी त्याचीच मुलं...।।५।।
समता वास करी अशा बुध्दाच्या घरी ।
जाऊन वामनपरी जनता पाय धरी ।
त्याच जनतेला इथं क्रांतिचं अवसान आलं...।।६।।