माझी भीमाई दिसेना
आज उदास उदास वाटे, माजी भीमाई दिसेना कोठे ।।धृ।।
रात्र विश्रांतीसाठी ही येते । विसावा विश्वाला येथे देते
उगवता दिनमणी साळू गाते । आपुल्या उद्योगालाही जाते
भुकेची आग जी पोटी जळते । पुरे ममता आता जगता म्हणते
मनी नसताना कठोरता येते । दूर बाळापासून माता होते
विसरते वात्सल्य आपुले नाते । धेनुही वत्साला सोडून जाते
तरी अस्तास जाता दिनमणी मिलन होते
परी आईने माझ्या तोडले पुरते नाते
शोक विरहाचा हृदयात दाटे...।।१।।
जवळ करिती इथे तर श्वानांना । तयांहून हीन पदी आमुची गणना
दया माया आमुची नव्हती कोणा । त्याच भीमाईला आली करूणा
पिता माझा अन् मी तर होतो तान्हा । आई तर नावच तिचे अंजाना
अशा सम कोटी कोटी बाळांना । जवळ भीमाईने केले जाणा
ज्ञान अमृताचा पाजून पान्हा । उरी कवटाळिले अपंगांना
आमुची तीच आई बुध्द सख्याची करुणा
सोडून गेली कशी एकाएकी बाळांना
ह्याच दुःखाने काळीज फाटे...।।२।।
नेत्र निराने आम्हाला न्हाणीले । जोजविले आणि स्तनपानीले
अंथरुण अंकाचे येथे केले । मायेच्या पंखांनी अन् उबविले
दीप नेत्रांचे तेवत ठेविले । थिजले परी कधी नाही विझले
निद्रादेवीस मुळी नाही शिवले। असे संगोपन कोटींचे केले
पाजले ज्ञान दुधाचे प्याले । आजचे दिवस आम्हा दाविले
समाज आज माझ्या सौख्य सागरी डोले
नसे पहावयास माऊली कौतुक आपुले
किती हतभागी आम्ही करंटे... ।।३।।
धन्य तव नाव आई म्हणजे आई । आईला उपमा कोठेही नाही
आई नाही, त्याची दुनिया नाही । आईची सर करील का दाई
म्हणावे कुणास मी आता आई । आई केलीस का ग इतुकी घाई
बाळ चुकले काही का ग बाई । गुन्हाही केला असा का गं काही
सजा तू का मजला दिधली नाही । विना पुसताना का गेलीस आई
पुरा दुःखाने तुझ्या ऊर फाटला जाई
तयात साठविण्या जागाही नाही
तेच झरते या नयनांच्या वाटे... ।।४।।
आईची आई भीमाई तू थोर । किती आठवावे तुझे उपकार
तयाखाली दबलो, झाला भार । तूच आई माझं केलं सारं
स्वाभिमानाची चारून भाकर। दुबळे मन माझे केले खंबीर
उघडुनी ज्ञान देवतेचे व्दार । बनविले तूच मला पदवीधर
तुझ्यामुळे मी बनलो आमदार । गाठला कोणी दिल्ली दरबार
जाहले कैक बडे हुद्देदार । मान सन्मान आज आम्हा फारं
तुझे हे आठविता उपकाराचे डोंगर
तू नाहीस आज हीच मनी हुरहुर
तुला आठविता तन मन पेटे...।।५।।
दुपारी सहा डिसेंबर छप्पनला । तुझ्या निर्वाणाचा अग्नि पाहिला
विजेच्या वेगाने कानी पडला । तुझा परिवार त्याने तडफडला
पुरा घायाळ होऊन फडफडला । टाहो फोडून तुझ्या साठी रडला
पूर नेत्राच्या गंगेला चढला । देश शोकाच्या सागरी बुडला
अचानक मृत्यू कैसा हा घडला । सिंह जाळ्यात कसा रे सापडला
नव्या रक्ताचा तरुण रक्त उसळूनी चिडला
म्हणे सांगाच कुणी खुनी कुठे रे दडला
कुणी केले हे धाडस मोठे...।।६।।
आता बाळांनो नाही रे आई । विवेकाने वागा भाई भाई
सांगण्या कोण तुम्हा आता येई । फूट संसारी पाडायची नाही
तीन तिरकुटची भाषा सोडा ही । अशाने जगहसू येथे होई
माजवू नका घरामाची दुही। दुहीने धुळधाण घरची होई
आहे रे कामाचा डोंगर डोई । कामे वाटून सर्वांनी घ्यावी
शिकवण माऊलीची अंतरी वामन ठेवी
नका रे फोडण्याची भाषा मुखे बोलू ही
तुझ्या बोलाचे बोचतात काटे...।।७।।