सर्पविज्ञान - SarpaVidnyan | Information About Snake | Questions and Answers About Snake | Facts About Snake


१. सापाचा स्पर्श हाताला कसा लागतो ?

:- सापांच्या स्पर्शाबद्दल थोडेसे कुतूहल आणि भिती असते. तो बिलबिलीत, बहुदा घाणेरडाच असतो; असा समज असतो. प्रत्यक्षात साप अतिशय स्वच्छ प्राणी आहे. थोडासा थंडगार आणि गुबगुबीत स्पर्श आपणास जाणवतो.


२. सापांना संगीत आवडते का ?
(नाग संगीताच्या तालावर का डोलतो ?)

:- अनेकदा सिनेमामध्ये किंवा प्रत्यक्षात गारुडी पुंगी वाजवताना साप डोलतो असे आपण पाहतो. सापांना बाह्य श्रवणसंस्था म्हणजे कान नसतात. त्यामुळे त्याला संगीत किंवा इतर कोणत्याही आवाजाचे ज्ञान होत नाही. सातत्याने तोंडातून आंत-बाहेर करणारी दुहेरी जीभ ध्वनी लहरींची संवेदना मेंदूपर्यंत पोहचवते. साप हालचालींचा वेध घेऊ शकतो. स्थिर वस्तूंचा नव्हे. गारुडी पुंगी वाजव्ताना पुंगी अर्धगोळाकार फिरवत असतो. त्यामुळे हलवल्या जाणाऱ्या ह्या पुंगीच्या हालचालीचा वेध घेताना नाग पुंगीच्या आवाजावर डोलतो. असा गैरसमज पसरवला जातो.


३. सापांचे प्रकार किती व कोणते ?

:- सापांचे अस्तित्व सगळ्या जगभर आहे. सापांचे चार प्रकार आढळतात.

१) बिळात (जमिनीत) राहणारे उदा. वाळा, मंडोल, डुरक्या घोणस, मण्यार. 

२) झाडावर राहणारे उदा. हरणटोळ, हिरवा घोणस, तस्कर, रुकासर्प. 

३) पाण्यात राहणारे उदा. दिवड, पाण दिवड, नानेटी, समुद्रसर्प इ. 

४) जमिनीवर राहणारे उदा. कवड्या, नानेटी, धामण, अजगर, नाग इ.


४. विषारी सापांची नावे सांगा ?

:- विषारी साप-नाग, मण्यार, पट्टेरी मण्यार, पोवळा सर्प (coral snake), नागराज, घोणस, हिरवा घोणस, फुरसे.


५. सर्वांत अधिक विषारी साप कोणता व का ?

:- भारतात आढळणाऱ्या विषारी सापांमध्ये नागराज (king cobra) हा सर्वात जास्त विषारी साप आहे. नागराज किंवा भुजंग या सापाच्या विषामुळे एकावेळी ३२ माणसे किंवा एक हत्ती मरेल, एवढे विषाचे प्रमाण असते.


६. सापांचे भक्ष्य कोणते ?

:- उंदीर, घुसी, बेडुक, सरडे, पाली, छोटे पक्षी, पानांवरील, झाडांवरील कीटक आणि मासे इ. आहेत.


७. सापांचे वसतिस्थान कोठे असते ?

:- सापांची वसतिस्थाने वेगवेगळी असतात. साप हे शीत रक्ती असल्यामुळे वेगवेगळ्या वातावरणात राहताना ते त्याच्याशी एकरुप होतात. शांतता, वर्दळ नसलेली ठिकाणे, थोडासा थंडावा तसेच ज्या ठिकाणी भक्ष्य (उंदीर, बेडूक इ.) मिळतील अशा ठिकाणी सापांचे वास्तव्य असते. दगड-विटांचा साठा, पालापाचोळा, झुडपे, झाडांची ढोली इ. ठिकाणी भक्ष्य (उंदीर, बेडूक इ.) मिळतील अशा ठिकाणी सापांचे वास्तव्य असते. वाडे, भुयारे अशा ठिकाणी सापांना राहण्यासाठी योग्य अशा कपारी किंवा खबदाडी असतात. पाणसाप पाण्यातील दगडाच्या खपाटीत किंवा पाण गवतात वास्तव्य करतात. समुद्रसाप समुद्रातच असतात.


८. सापांची पुनरुत्पत्ती फक्त अंड्यातूनच होते का ?

:- सापांची पुनरुत्पत्ती दोन प्रकारे होते. एक म्हणजे. अंडज सर्प अंडी घालतात. उदा. नाग, मण्यार, धामण, अजगर इ. तर काही सर्प पिलांना जन्म देतात. उदा. घोणस, फुरसे, चापडा, हरणटोळ


९. साप आपले संरक्षण कसे करतो ?

:- सापांना त्रास दिल्यासच ते आक्रमक पवित्रा घेतात. निसर्गाने दिलेल्या विविध रंगाने सापांचे संरक्षण होते. विषारी सापांचे रंग अतिशय मोहक असतात. त्यामुळे ते सभोवतालच्या वातावरणात एकरुप होतात. आक्रमण झाल्यास साप बचावासाठी वैशिष्ट्यपूर्ण पवित्रा घेतात. उदा. नाग फणा उभारुन दाखवतो, घोणस जोरजोराने फुत्कार टाकतो.


१०. सापाचे विष कोठे असते ?

:- साप जन्मल्यापासूनच त्याच्या तोडांत असलेल्या विषग्रंथीत विष तयार होऊ लागते. विषारी सापांच्या दोन्ही गालात विषग्रंथी डोळ्याच्या मागील बाजूस असतात. सस्तन प्राण्यातील लालोत्पादक ग्रंथी प्रमाणे सापांच्या विषग्रंथी असतात. या ग्रंथीतून एक नलिका दातांच्या पोकळीत येते. भक्ष्य पकडल्यावर दातांद्वारे विष भक्ष्याच्या शरीरात जाते. त्यामुळे गिळलेले भक्ष्य पचण्यास सुलभ जाते.


११. सर्प विष प्रतिबंधक लस कशी तयार करतात ?

:- विषारी सापाचे विष घोड्याच्या शरीरात इंजेक्शनने वारंवार पण अल्प प्रमाणात टोचतात. अशा प्रकारे काही महिने त्याच्या रक्तात सर्पविष गेल्यावर त्याची प्रतिकार शक्ती एवढी वाढते की, नेहमीच्या सर्पदंशाच्या ऐंशीपट अधिक तो विष पचवू शकतो. अशा घोड्याचे रक्त काढण्यात येते. त्यातील द्रवघटक वेगळा करुन सर्पविषप्रतिबंधक लस तयार करण्यात येते.


१२. साप कात का टाकतो ?

:- सापाची कातडी कडक खवल्यांची बनलेली असते आणि त्यामुळे त्यांची वाढ खुंटण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाटी साप त्याच्या शरीरावर असलेले पातळ कातीचे आवरण दर दोन-तीन महिन्याच्या कालांतराने नियमित टाकतो. याशिवाय कातीच्या रुपाने त्याच्या शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात.


१३. सापांच्या चालीचे प्रकार कोणते ?

:- सापांच्या चालीचे प्रमुख तीन प्रकार आहेत.

१) नागमोडी चाल या चालीत साप पुढे सरकताना डोळ्यांपासून शेपटीच्या टोकापर्यंत जमिनीवर लहरी आल्यासारख्या किंवा इंग्रजी "S" सारख्या नक्षी प्रमाणे दिसतो. लांब शरिराचे सर्व साप याच पद्धतीचा वापर करतात. उदा. नाग, धामण, धूळनागीन, नागराज इ.


२) सुरवंटासारखी चाल : या चालीत साप एकही वेटोळे टाकीत नाही. या चालीत साप पोटाकडील आणि त्या लगतच्या इतर खवल्यांवर तसेच बरगड्यांजवळील भाग स्नायूंना ताण देऊन उभारतात व जमिनीवर शरीराचा दाब देऊन पकड घेतात. अजगर किंवा घोणसासारखे जाड शरीराचे साप सुरवंटासारखे चालतात.


३) वेलांटी चाल फुरसे हा विषारी साप, मान उचलून तिरकी करुन पुढे सरकवितो. त्यामुळे मानेबरोबर त्याचे शरीर त्या दिशेस फेकल्यासारखे जाते. या चालीत साप तिरका सरपटत जातो.


१४. सापाच्या डोळ्यात संमोहनाचे सामर्थ्य असते व तो प्राण्यांना संमोहित करुन चावतो, हे खरे आहे का ?

:- नाही ! सापाच्या डोळ्यात संमोहनाचे सामर्थ्य नसते तसेच तो प्राण्यांना संमोहित करुन चावतो हा गैरसमज आहे. सापांच्या डोळ्यावर पारदर्शक आवरण असते. तसेच त्याला पापण्याही नसतात. साप कधीही पापण्या मिटू शकत नाही. त्यामुळे साप एकटक पाहतोय असा भास होतो. त्यातूनच ही गैरसमजूत दृढ झाली आहे.


१५. साप चावण्याच्या जागा कोणत्या ?

:- सर्प बहुदा चालत असता पायाला तसेच गवत कापणे वा बागकाम वगैरे सारखी कामे करताना हाताला चावण्याचा संभव असतो. शरीराच्या इतर ठिकाणी चावण्याचे प्रमाण कमी असते.


१६. सापाच्या विषाबद्दल थोडक्यात माहिती द्या ?

:- सर्पविष फिकट पिवळसर आणि पारदर्शक असून ते काहीसे चिकट असते. सर्पविष आम्ल युक्त असते. त्यामध्ये वेगवेगळी प्रथिने आणि वितंचके असतात. साप विष भक्षाच्या शरीरात टोचतो. त्यामुळे तो प्राणी बहुदा बेशुद्ध पडतो आणि सापास त्याचे भक्ष पकडून खाणे सोपे जाते.


१७. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला झोपू का देत नाहीत ?

:- सर्पदंश झालेल्या व्यक्तीला जर नाग किंवा मण्यार या जातीचा साप चावला असेल तर डोळ्याच्या पापण्या जड होतात आणि झोप लागल्यासारखे होते. त्यामुळे विषाचा परिणाम आहे का दुसरा कसला परिणाम आहे हे कळण्यासाठी त्या व्यक्तीला झोपू दिले जात नाही. परंतु या व्यक्तीला मंदिराभोवती फेन्या घालायला लावणे चुकीचे आहे.


१८. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस लिंबाचा पाला कडू लागत नाही. मिरची तिखट लागत नाही ? का ?

:- अजुनही बऱ्याच ठिकाणी सर्पदंश झालेल्या व्यक्तीला सर्पदंश विषारी का बिन विषारी ओळखण्यासाठी मिरच्या, लिंबाचा पाला, मीठ खायला दिले जाते. जर झालेला सर्प दंश नाग किंवा मण्यार यांचा असेल तर जिभेची संवेदना जाते. त्यामुळे चव कळत नाही. परंतु अशी कृती करणे म्हणजे वेळेचा अपव्यय करणे होय. कारण संवेदना जाणवेपर्यंत वाट पाहील्यास विष शरीरभर भिनते. शिवाय घोणस किंवा फुरशाच्या बाबतीत मीरच्या, लिंबाच्या पाल्याचा उपयोग होत नाही.


१९. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला दिव्याकडे किंवा उजेडाकडे पाहावयास का लावतात ? 

:- सर्पदंश जर विषारी असेल तर डोळ्यांवरही त्याच्या परिणाम होतो. दिवा किंवा लाईट यांच्या दोन-दोन प्रतिमा दिसतात. पंरतु ही कृती सुद्धा वेळेचा अपव्यय आहे.


२०. सापाच्या विषाचा उपयोग होतो का? कोणता?

:- सापाच्या विषात विषारी द्रव्याप्रमाणे मानवास उपयुक्त असणारी पाचकद्रव्ये पण असतात. सापाचे विष हे एक उपयुक्त औषध आहे. सर्प विषाचे पृथक्करण करुन त्यातील घटकांचा वापर औषधांमध्ये केला जातो. घोणसाच्या विषात रक्ताच्या गुठळ्या बनविण्याचा गुणधर्म असतो. त्यामुळे रक्तस्त्राव थांबविण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. गर्भाशय आणि बुब्बुळ यातून वाहणाऱ्या रक्तावर देखील हा उपचार यशस्वी ठरत आहे.


स्नायूतून निघणाऱ्या कळांची व्याधी, सांधे दुखी आणि शस्त्र क्रियेनंतर देखील असाध्य किंवा शस्त्र क्रिया होऊ न शकणारी घातकी व्याधी यावर नागविषाचा उपचार करण्यात येतो. फेफरं, दमा, संधिवात, उसण, पाणथरी, माकड हाडाचं दुखण, निद्रानाश यावर रॅटल सापाचे विष उपयोगात आणले जाते. सर्पदंश झाल्यावर 'प्रतिसर्पविष' इंजेक्शन दिले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने सर्पविषाचाच उपयोग केला जातो.


२१. साप चावला असता कोणते प्रतिबंधक उपाय योजावेत ?

:-

१) सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा भीतीने मानसिक तोल जातो. त्यामुळे सर्व प्रथम त्याला धीर द्यावा.


२) रोग्यास श्रम (बोलणे, चालणे) न होऊ देता त्यास पडून राहण्यास सांगावे.


३) सर्पदंश झालेला अवयव हृदयाच्या पातळीपेक्षा खालच्या पातळीवर स्थिर ठेवावा.


४) जखम हळुवारपणे जंतुनाशकाने स्वच्छ करावी किंवा त्वरीत पाण्याने धुवावी.


५) केवळ नाग किंवा मण्यार चावले असल्यास आवळपट्टी बांधावी, आवळपट्टी प्रत्येक दहा मिनीटांनी एक मिनीटभर सैल करुन परत बांधावी.


६) चावलेल्या ठिकाणी उभे कापून रक्तस्त्राव वाहू द्यावा, जखम करणे माहीत नसल्यास जखम करु नये.


७) लवकरात लवकर वैद्यकीय उपचार करण्यासाठी दवाखान्यात न्यावे / त्याला उचलून घेवून जावे.


२२. विषारी साप चावल्यास कोणकोणती लक्षणे दिसतात ?

:-

विषारी सापाचे विष दोन प्रकारे शरीरावर परिणाम करते 

अ) नाग व मण्यार चावले असता मज्जासंस्थेवर परिणाम होतो. 

ब) घोणस व फुरसे चावल्यावर रक्तावर परिणाम होतो.


नागाचा दंश

१) दंश झालेल्या जागी जळजळ होऊन सूज येते.

२) अंग जड झाल्यासारखे वाटते, झोप येते हातपाय गळाल्यासारखे वाटतात. 

३) डोळ्यांच्या पापण्या जड होऊन मिटतात.

४) तोडांतून लाळ गळू लागते, उलट्या होतात. घाम फुटतो, श्वास घेणे जड जाते, बोलणे कठीण जाते.

५) हृदयाचे ठोके वाढतात.


मण्याराचा दंश

१) मण्यार सापाचा दंश झाल्यावर आढळणारी बरीचशी लक्षणे नागाच्या दंशाप्रमाणे असतात. फक्त सर्प दंश झालेल्या जागी जळजळ किंवा सूज येत नाही.

२) पोटात आणि सांध्यात अतिशय वेदना होतात.


घोणसाचा दंश

१) दंश झालेल्या जागी प्रथम जळजळ सुरु होऊन नंतर ती संपूर्ण अवयवांवर पसरते.

२) दंश झालेला भाग हिरवट-निळसर होऊन सुजू लागतो.

३) दंश झालेल्या भागातून, हिरडीतून आणि लघवीतून रक्तस्त्राव होतो व अशक्तपणा येतो. 

दंश फुरसाचा लक्षणे जवळ जवळ घोणसाच्या दंशाप्रमाणेच असतात.


२३. सर्प दंश झाल्यावर दंशाच्या जागी ब्लेडने चिरा पाडून तोंडाने रक्त शोषून, विष थुंकावे का ?

:-

सर्प दंश झाल्यावर दंशाच्या ठिकाणी ब्लेडने उभे कापावे. आडवे कापू नये. अन्यथा चुकीने एखादी रक्तवाहीनी कापली जाऊन अतिरक्तस्त्रावामुळे अपाय होण्याची शक्यता असते. या बाबतीत पूर्ण ज्ञान असल्याशिवाय शरीरावर चिरा घेऊ नयेत.


ब्लेडने किंवा कोणत्याही निर्जतुक शस्त्राने चिर पाडून तोंडाने विष शोषून थुंकणे हा प्रकार पूर्णपणे खात्रीलायक नाही. तोंडामध्ये व्रण असल्यास अपायच होण्याची शक्यता असते. अशा प्रकारचे धाडस कुणीही करु नये.


२४. सर्प विष पिल्याने माणूस मरतो का ?

:- सर्प विष रक्तात गेल्यास परिणाम होतो. सर्प विष प्यायल्यास जठरात जखम नसल्यास त्याच्या शरीरावर काहीही परिणाम होत नाही.


२५. दंश झालेल्या ठिकाणी लोखंडाने चटका दिल्यास विष उतरते का ? 

:- दंश झालेल्या ठिकाणी लोखंडाने चटका दिल्यास विष उतरत नाही. सर्पदंशावर सर्पविष प्रतिबंधक इंजेक्शन दिल्यानेच सर्व विष उतरते.


२६. साप जिभेने चावतो हे खरे काय ?

:- नाही ! सापाला आपल्या जिभेचा उपयोग आवाज (ध्वनिलहरीची कंपने) आणि गंधज्ञान ओळखण्यासाठी होतो. तो दातानेच चावतो.


२७. काही सापाच्या ओठाच्या मागच्या बाजूस खळगा असतो. त्याचा सापाला काय उपयोग होतो ?

:- चापडा (Bamboo pit Viper किंवा हिरवा घोणस) सापाचा डोळा आणि नागपुडी यांच्या मध्ये खड्डा असतो. अजगराच्या जबड्याच्या पुढील बाजूस लहान खाचा असतात हे खड़े किंवा खाचा वातावरणातील अल्पशा तापमानाच्या फरकाचे ज्ञान मिळवितात. हे साप निशाचर असतात. त्यामुळे त्याचे भक्ष्य अंधारात नेमके कोठे आणि किती अंतरावर आहे. हे त्यांना समजते. त्याचप्रमाणे हलत्या भक्ष्याचा वेग आणि दिशाही त्यांना समजते.


२८. साप आपल्या आकाराहून मोठे भक्ष्य कसे गिळतो? मोठा प्राणी गिळताना तो गुदमरत का नाही ?

:- सापाच्या तोंडाच्या विशिष्ट रचनेमुळे तो स्वतः पेक्षाही मोठ्या आकाराचा प्राणी गिळू शकतो. सापांचे दोन्ही जबडे (खालचा व वरचा) हे एकमेकापासून विभक्त असतात. त्यामुळे हे जबडे एकमेकांशी १८०° कोनात उघडू शकतात. तसेच ते विभक्त असल्याने आपल्या आकाराहून मोठा प्राणी गिळू शकतात.


२९. साप आपले अन्न लवकर पचावे म्हणून झाडाला वेटोळे घालतो हे खरे आहे का ? 

:- सापाने आपले भक्ष्य गिळल्यानंतर तो भक्ष्याचे पूर्ण पचन होईपर्यंत स्वस्थ पडून रहातो. झाडाला वेटोळे घालत नाही.


३०. साप थंड रक्ताचे प्राणी आहेत म्हणजे काय?

:- वातावरणात होणाऱ्या तापमानातील फरकाप्रमाणे सापांच्या शरीराचे तापमान तात्काळ बदलू शकत नाही. अशा वेळी हालचाल करण्यासाठी त्यांना बाहेरील उर्जेवर अवलंबून रहावे लागते. आवश्यक असलेले शरीराचे तापमान होईपर्यंत ते कोणतीही हालचाल करत नाहीत. यालाच शीत रक्ती (Cold-blooded) असे म्हणतात.


३१. मुंगूस व नाग यांच्या लढाईत मुंगूस जखमी झाल्यास ते विशिष्ट झाडाचे मूळ खावून स्वतःचा बचाव करतो हे खरे आहे का ?

:-

साप हे मुंगूसाचे भक्ष्य आहे. त्यामुळे आपले भक्ष्य पकडण्यासाठी मुंगूस अतिशय चपळतेने हल्ला करते. त्यामुळे मुंगूस सहसा मरत नाही. तरी सुद्धा मुंगूसाच्या शरिरावर दाट केस नसलेल्या ठिकाणी (उदा. पाय किंवा तोंड) नागाने चावा घेतल्यास मुंगूस मरु शकतो. झाडाची मूळी खाऊन रक्षण करता येत नाही.


३२. मांडूळ सापास दोन्ही बाजूस तोंड असते. तो सहा महिने एका तोंडाचा वापर व सहा महिने दुसऱ्या तोंडाचा वापर करतो. हे खरे आहे का ?

:-

सर्व साधारणपणे सापाची शेपटी लांबलचक आणि सडपातळ असते. मांडूळ सापाची शेपटी आखड बोथट आणि तोडासारखी जाड असते. अशा शेपटीचा उपयोग तो उंदराची अरुंद बिळे मोठी करण्यासाठी किंवा जमिनीत आत शिरण्यासाटी करतो. शेपटीच्या तोंडासारखा आकारामुळे गारुडी शेपटीला ऑईलपेन्टने डोळ्यासारखा आकार काढतो. प्रत्यक्षात कोणत्याही सापाला शेपटीच्या ठिकाणी तोंड नसते.


३३. सापांना एकापेक्षा अधिक तोंडे असतात का ?

:- जन्मल्यानंतर क्वचित प्रसंगी सापांना तोंडाच्या ठिकाणी एका ऐवजी दोन तोंडे असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. डुरक्या घोणस या सापास पुणे येथील सर्प उद्यानात जन्मजात दोन तोंडे आढळली. असे साप फार काळ जगत नाहीत. 


३४. नागाच्या डोक्यावर नागमणी असतो हे खरे का ?

:- कोणत्याही नागाच्या डोक्यावर नागमणी नसतो. गारुडी नागमणी म्हणून जे दाखवतात. ते काचेचे खडे असतात. ते चिटकवलेले असतात. 


३५. साप डुख धरतो का ?

:- सापांचा मेंदू अविकसित आहे. त्याच्या मेंदूचे वजन त्याच्या वजनाच्या एक टक्का इतके देखील नसते. त्याची स्मरणशक्ती, बुद्धी, कमकुवत असते. सापांना तीन फुटापेक्षा जास्त अंतरावरचे दिसत नाही.त्याच्यात विचारक्षमता नसल्याने त्याला त्रास देणाऱ्या व्यक्तींना ओळखणे, लक्षात ठेवणे या गोष्टी अशक्यप्राय आहेत. त्यामुळे साप डुक धरणे किंवा बदला घेणे ही गोष्ट अशास्त्रीय आहे. भूक लागली असता भक्ष्य पकडणे, तहान लागली असता पाणी पिणे आणि झोपा काढणे या पलिकडे साप विचार करु शकत नाही. आपल्याला त्रास देणार्या व्यक्तीला लक्षात ठेवून बदला घेण्याइतका सापाचा मेंदू विकसित झालेला नाही. सापाला हवेतील आवाजसुध्दा ऐकू येत नाहीत. जमीनीवरील कंपने समजतात.


३६. साप दूध पितो का ?

:- सर्व साप हे मांसाहारी आहेत. उंदीर, घुशी, बेडूक, सरडे, पाली, छोटे पक्षी इ. सापाचे अन्न आहे. साप दूध पित नाही. सापाला दूध पाजल्यास सापांच्या अन्ननलिका, श्वसनसंस्थेतील अवयवांवर परिणाम होऊन सापांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. दूध हे सापांना विषासारखे आहे. गारुडी सापाला अनेक दिवस तहानलेला ठेवतो. समोर दुधाची वाटी ठेवली असता, तो पाणी समजून पितो.


३७. धामण गाईच्या कासेला तोंड लावून दुध पिते हे खरे आहे का ?

:- नाही ! अशा सर्व कथा आपण आपल्या पूर्वजांकडून ऐकत आलो आहोत. दूध हे सापांचे अन्नच नाही.


३८. कृष्ठरोग्याला साप चावत नाही. चावला तरी विष बाधत नाही. हे खरे आहे का ? 

:- कुष्ठरोग्याला साप चावतो आणि विषही बाधते. परंतु महारोग्याची संवेदनाच गेलेली असल्याने त्याला फक्त साप चावल्याची जाणीव होत नाही.


३९. ठार मेलेल्या सापावर रॉकेल टाकले असता तो पुन्हा जिवंत होतो का ? 

:- नुकत्याच मारलेल्या सापावर जर रॉकेल टाकले तर जखमेस प्रचंड वेदना होतात. त्यामुळे साप वळवळू लागतो. परंतु ही हालचाल काही क्षणा पुरती असते परंतु साप जिवंत होत नाही.


४०. साप मारल्यानंतर त्याच्या रक्तातून अनेक पिले तयार होतात काय ? 

:- सर्पांचे प्रजनन हे दोनच मार्गाने होते. एक म्हणजे अंडज, दुसरे पिलज. रक्तातून पिले तयार होत नाहीत.


४१. केवडा व रातराणी यांच्या सुगंधामुळे त्यांच्या आसपास साप असतात, हे खरे आहे का ? 

:- रातराणी, केवडा या झाडांच्या फुलांच्या सुगंधाने त्याठिकाणी अनेक प्रकारचे कीटक आकर्षित होतात. त्यांना खाण्यासाठी बेडूक, पाली, सरडे हे येतात. यांना खाण्यासाठी साप त्याठिकाणी येतात.


४२. घराच्या आसपास साप येऊ नयेत म्हणून काय उपाययोजना करावी ? 

:- घराच्या आसपास साप येऊ नयेत म्हणून -

१) आपल्या घराबाहेरील भिंती किंवा कुंपणाच्या भिंतीस भोके पडली असतील किंवा तडे गेले असतील तर ती बुजवावीत. 

२) घराजवळ पाला पाचोळा, केरकचरा, दगड विटांचा ढीग, लाकडांचा साठा इत्यादी साठू देवू नये, आसपासचा परिसर नियमित स्वच्छ ठेवावा.

३) खिडक्या, दारे किंवा घरास लागून वेल किंवा फांद्या येणार नाहीत याची दक्षता घ्या. 

४) सरपण आणि गोवऱ्या घरालगत न ठेवता काही अंतरावर आणि थोड्या उंचीवर ठेवाव्यात.

५) घरातील पाळीव पशु-पक्षी घरात न ठेवता काही अंतरावर सुरक्षित पिंजऱ्यात ठेवावेत. 

६) उथळ पाण्यात सापाचा वावर असल्याने गुरे, कपडे, भांडी धुण्यापूर्वी काळजीपूर्वक जागेची पाहणी करावी.


४३. सर्प विषावर मंत्रोपचार घ्यावेत का?

:- सर्पदंशावर मंत्रोपचार घेऊ नयेत. विषारी साप चावला असता कोणतेही मंत्रतंत्र, जडीबुटीचे औषध, अंगारे-धुपारे, भस्म, आयुर्वेदिक व तत्सम औषधे यांचा उपयोग होत नाही. सर्प दंश झाल्यावर सर्पप्रतिबंधक इंजेक्शन दिल्यानेच रोगी बरा होऊ शकतो.


४४. जगात व भारतात सापाच्या किती जाती आहेत ?

:- जगात सापाच्या सुमारे अडीच हजारावर जाती आहेत. भारतात या पैकी २३८ जाती सापडतात. यापैकी ५२ जातीचे साप विषारी या सदरात येतात. जवळ-जवळ ४० जाती समुद्रात असतात. उर्वरित जाती पैकी अनेक जातीचे साप घनदाट जंगलात असतात. मनुष्यवस्तीच्या आसपास आढळणाऱ्या प्रामुख्याने चारच विषारी सापाचे विष, अपायकारक ठरु शकते या चार जाती म्हणजे नाग, मण्यार, घोणस, फुरसे.


४५. किंग कोब्रा या सापाचे वैशिष्ट्य काय ?

:- किंग कोब्रा किंवा नागराज हा भारतात आढळणारा सर्वाधिक विषारी साप असून त्याची लांबी १८ फुटापर्यंत असते. इतर सर्प खाऊनच हा सर्प आपली गुजराण करतो. हा सर्प फणा काढून पाच फूट उभा राहू शकतो. इतर सापाच्या मानाने या सापाचा मेंदू विकसित असल्याने, घरटे बनवू शकणारा तो जगातील एकमेव साप आहे. या सापाची मादी आपल्या वेटोळ्यात पालापाचोळा गुंडाळून आणते आणि ढीग रचते. अंडी घातल्यावर, या घरट्याच्या मध्यभागी मादी अंड्याचे रक्षण करीत बसते.


४६. सर्प दंश होऊ नये म्हणून रात्री शेतकरी काठी आपटत चालतात. ते का ?

:- काठी आपटल्याने उत्पन्न होणाऱ्या ध्वनी लहरींची संवेदना सापांना जाणवते. ही संवेदना सुमारे ५० फूट अंतरावरुन सापांना जाणवते. त्यामुळे वाटेत असलेला साप बाजूला निघून जाऊ शकतो. अशा वेळी आडवाटेत साप येणे किंवा सापावर पाय पडणे अशा घटना आपण टाळू शकतो.


४७. सापाच्या ज्ञानेंद्रियांची माहिती द्या.

:-

कान - सापांना आपल्यासारखे बाह्य कर्ण नसतात. मात्र सापांना आंतरकर्ण असतात. सापांना आवाजाचे ज्ञान जमिनीलगतच्या ध्वनिलहरींच्या कंपनाने होते.

डोळे - डोळे हे सांपाच्या ज्ञानेंद्रियातील महत्त्वाचे इंद्रिय आहे. साप एकाच वेळी दोन्ही डोळ्यांनी दोन वगेवेगळी दृश्ये पाहू शकतात. झाडांवर वास्तव्य करणार्या सापांचे डोळे इतर सापांच्या मानाने आकाराने मोठे असतात. दिनचर वृत्तीच्या सापांच्या डोळ्यांची बाहुली गोल असून, निशाचर वृत्तीच्या सापांच्या डोळ्याची बाहुली उभी असते. निशाचर सापांच्या नेत्रपटलावर प्रकाश संवेदनक्षम पेशी असल्यामुळे अंधारातही त्यांना दिस शकते. दिनचर सापांना अंधारात दिसत नाही. सापांच्या डोळ्यांना आपल्यासारख्या पापण्या नसतात. त्यामुळे त्यांना आपल्यासारखे डोळे बंद करता येत नाहीत. साप आपल्याप्रमाणे डोळे मागे-पुढे किंवा खालीवर फिरवू शकत नाही.


जीभ - सापाची जीभ लांब असून, टोकाजवळ दुभंगलेली असते. भक्ष शोधताना साप जीभ सारखी आत बाहेर करीत असतो. सापाचे दोन्ही जबड़े बंद असतानाही त्याला जीभबाहेर काढता येते आणि जिभेचा वापर नसताना ती खालील जबड्यातील गोलाकार नलिकेत असते. जिभेचे रंग विविध असून, दोन्ही टोके नाजूक आणि ओलसर असतात. दोन्ही टोकांच्या सहाय्याने साप हवेतील धुलीकण आणि गंधकण गोळा करुन टाळूत असलेल्या गंधवाहक ग्रंथीत नेतो. यामुळे सापाला गंधज्ञान होते. भक्ष्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काही साप आपल्या जिभेचा उपयोग करतात.


कात - सापाची कातडी कडक खवल्यांची बनलेली असते. खवल्यांच्या रचनेनुसार प्रत्येक जातीच्या सापाची कात वेगळी असते. प्रत्येक साप साधारणतः दर दोन तीन महिन्यांनी कात टाकतो. कातीचा रंग पांढरट असून ती नाजूक असते.


त्वचा - सापाची त्वचा कडक खवल्यांची बनलेली असते. सापांच्या अंगावरील खवल्यांची संख्या आणि आकार त्यांच्या जातीनुसार बदतात. खवल्यांची संख्या मोजून सापाची जात ओळखता येते. सापाचे खवले आणि कातडीमुळे सूर्याच्या अतिनील किरणापासून त्याचे संरक्षण होते.


दात - सापाच्या दोन्ही जबड्यात दात असून त्यांची रचना वेगवेगळी असते. विषारी सापाचे विषदंत इंजेक्शनच्या सुईसारखे पोकळ असतात. विषग्रंथीतील विष दातांच्या पोकळीतून भक्षाच्या शरीरात उतरते. नाग, मण्यार यांसारखे विषारी सापांचे दात वरच्या जबड्यात पुढच्या बाजूला पक्के बसविलेले असतात. तर फुरसे, घोणस या सारख्या विषारी सापांचे विषदंत हे वरच्या जबड्यात पुडे घडी घालून दुमडून बसविल्यासारखे असतात. तोंड उघडून चावा घेते वेळी ही घडी उघडली जाते. संर्पदंश झाल्यानंतर जखमेवरील दातांचा खुणांप्रमाणे साप विषारी का बिनविषारी हे ओळखणे सोपे जाते.


४८. सापाचे शत्रू कोणते?

:- अनेक पक्षी व प्राण्यांचे साप हे खाद्य आहे. काही पक्षांच्या जाती उदा. बहिरी ससाणा, घुबड, बगळा, करकोचा, शिकारा, मोर इ. साप मारुन खातात. मुंगूस, मांजर या सारखे प्राणीदेखील कधी कधी साप मारुन खातात. सापाचा सर्वांत मोठा शत्रू म्हणजे माणूस. शास्त्रीय माहितीचा अभाव, भिती आणि अंधश्रद्धेपोटी माणूस सापांची हत्या करतो.


४९. साप मानवजातीचा मित्र कसा ?

:-

सापाचे मुख्य अन्न उंदीर आहे. उंदराची प्रजनन क्षमता प्रचंड आहे. एक उंदराची जोड़ी (नर-मादी) वर्षाला ८५० पेक्षा अधिक पिलांना जन्म देते. उंदीर देशातील २५-३० टक्के अन्न धान्य खातात. तसेच त्यांची नासाडी करतात. अशावेळी उंदीर-घुशींच्या संख्येवर नैसर्गिकरित्या नियंत्रण घालण्याचे काम साप करतात. त्याचप्रमाणे पाणसाप आणि झाडावरच साप पिकावरील छोटे कीटक खातात. त्यामुळे पिकांचे संरक्षण होते. हिरव्या पाठीच्या पाणसर्पाची पिले डासांच्या अळ्या व अंडी खातात. यामुळे डासांच्या निर्मितीला आळा बसतो. साप हे शेतकयांचेच नव्हे तर पर्यावरण संतुलनाचे कार्य करणारे सर्व मानव जातीचे मित्र आहेत. सापाच्या विषात विषारी द्रव्याप्रमाणे मानवास उपयुक्त असणारी पाचक द्रव्ये पण असतात. सापाचे विष हे एक उपयुक्त औषध आहे. सर्पविषाचे पृथःकरण करुन त्यातील घटकांचा वापर औषधांमध्ये केला जातो. घोणसाच्या विषात रक्ताच्या गुठळ्या बनविण्याचा गुणधर्म असतो. त्यामुळे रक्तस्त्राव थांबविण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. गर्भाशय आणि बुब्बुळ यातून वहाणाऱ्या रक्तावरदेखील हा उपचार यशस्वी ठरत आहे. फेफर, दमा, संधिवात, उसण, पाणथरी, माकड हाडाचं दुखणं, निद्रानाश यावर रैटल सापाचे विष उपयोगात आणले जात आहे. सर्प दंश झाल्यावर प्रतिसर्पविष' इंजेक्शने दिली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने सर्प विषाचाच उपयोग केला जातो.


५०. सापांना संरक्षण देणारा कोणता कायदा अस्तित्वात आहे ?

:-

सापांचे रक्षण करणारा 'वन्यजीवन संरक्षण कायदा' १९७२ पासून अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार सर्प पकडणे, बाळगणे, मारणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. कोणताही जंगली प्राणी पाळण्यापूर्वी त्यासंबंधीचा परवाना घेणे आवश्यक आहे. या कायद्याने सर्व सापांना संरक्षण दिले गेलेले आहे. 'भारतीय अजगर' आणि 'भारतीय अंडी खाऊ साप' ह्या दोन सापांचे अस्तित्व भारतातून नष्ट होत आले आहे. तसेच सगळ्या सापांच्या किंवा सापांपासून तयार होणाऱ्या वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. परंतु कायद्याने सर्पहत्या थांबणार नाही. त्यासाठी लोकशिक्षणाची गरज आहे.


५१. सापाबद्दलच्या अंधश्रद्धा कोणत्या ?

:- सापाबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा, गैरसमज आहेत.

त्या पुढील प्रमाणे :


१) साप दूध पितो.

२) साप पुंगीच्या तालावर डोलतो.

३) सापांना सुगंधाची आवड असते, तो केवड्याच्या बनात राहतो.

४) साप 'डुक' धरतो, त्याला चिडविणाऱ्या किंवा त्रास देणाऱ्या व्यक्तीचा बदला घेतो.

५) काही साप वर्षांनी मानवी अवतार घेतात. 

६) साप चावला असता उलटा होतो. त्यामुळे विष शरीरात जाते.

७) धामणीच्या शेपटीत काटा असतो. ती गाई-म्हशीच्या नाकात शेपटी घालून त्यांना मारते. धामण गाई म्हशीच्या पायाला विळखा घालून दूध पिते.

८) जुनाट सापांच्या शरीरावर केस असतात.

९) साप धनसंपत्तीचे रक्षण करतो.

१०) सर्प विष मंत्रोपचाराने उतरवता येते.

११) नागाच्या डोक्यावर नागमणी असतो.

१२) हरणटोळ सर्प माणसाच्या डोक्यावर उडी मारुन टाळू फोडतो.

१३) अजगर माणसाला गिळतो.

१४) गरोदर स्त्री आणि साप यांची नजरानजर झाल्यास सापाचे डोळे जातात.


५२. साप जीभ बाहेर का काढतो व फणा का उभारतो ?

:- ध्वनिलहरींची कंपने व गंधज्ञान होण्यासाठी नाग जीभ आत बाहेर करत असतो. संरक्षणासाठी बचावात्मक पवित्रा म्हणून नाग मानेजवळील बरगड्या रुंदावतो व फणा काढून भिती दाखवत असतो.


५३. देवाचा नाग असल्यास त्याच्या अंगावर केस असतात. हे खरे आहे काय ?

:- सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर केस नसतात, सस्तन प्राण्यांच्या अंगावर केस असतात. गारुडी किंवा मदारी लोक मेंढीच्या किंवा शेळीच्या शेपटीच्या केसांचा पुंजका मोठ्या सूईमध्ये ओवून सापाच्या नाकपुडीच्या वरच्या बाजूस ओवून टाकतात आणि त्याला मीशीसारखा आकार प्राप्त होतो.काही दिवसांनी ही जखम भरल्यावर केस घट्ट बसतात. आणि गारुडी लोक यालाच देवाचा नाग म्हणून लोकांना फसवितात.


५४. सर्पामधील नर-मादी कशी ओळखतात ?

:- सर्वसामान्यपणे मोठा असतो तो नर आणि लहान असते ती मादी अशी आपल्याकडे एक समजूत आहे. परंतु सापात मात्र ते नेमके उलटे असते. नर आकाराने लहान तर मादीची लांबी किंचित लांब असते. त्यातही सापांच्या जनन इंद्रियांची रचना शरीराच्या आतल्या बाजूस असल्याने ते ओळखणे अवघड असते. सापाला हातात धरुन त्याची जनेनइंद्रिय तपासण्यासाठी सापाच्या गुदद्वाराजवळ अंगठ्याने दाबले असता नराचे वृषण बाहेर येते. मादी असेल तर गुदद्वाराजवळचा भाग पसरला जावून योनी स्पष्ट दिसते.


५५. साप कात का टाकतो ?

:- साप जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सारखे वाढत असतात. सापाला बाह्यत्वचेचे आवरण या वाढीच्या वेळेस अडथळा ठरते. शिवाय शरीरातील इतर उत्सर्जित घटकही कातीबरोबर बाहेर टाकले जातात. पहिली कात तिसऱ्या दिवशी, दुसरी सातव्या दिवशी, पंधराव्या दिवशी चौथी, महिन्याने व त्यानंतर प्रत्येक अडीच ते तीन महिन्याने कात टाकतो.

Post a Comment (0)
Previous Post Next Post