पंडित जवाहरलाल नेहरू
भारताच्या इतिहासात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी इंग्रज सरकारविरुद्ध ठामपणे उभे राहून जनतेच्या मनात आदराचं स्थान निर्माण करणारे थोर नेते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, पंडितजींचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे एका सुसंस्कृत कुटुंबात झाला . त्यांचे वडील मोतीलाल नेहरू एक ख्यातनाम वकील होते. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनीही महत्त्वपूर्ण काम केले होते. स्वातंत्र्याविषयीची तळमळ आणि कळकळ असणाऱ्या कुटुंबात जन्मल्यामुळे सहाजिकच बालपणात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर सामाजिक कार्याचे संस्कार झाले होते.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण अलाहाबाद येथेच झाले. सन १९०५ मध्ये ते उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथे हॅरो, केम्ब्रिज, ट्रिनिटी या शिक्षण संस्थात त्यांनी शिक्षण घेतले. शिक्षण चालू असतानाच इतर पुस्तके वाचनावरही त्यांचा भर होता. देशोदेशीच्या देशभक्तांची चरित्रे, भारताची इतिहासात्मक पुस्तके त्यांनी वाचून काढली आणि अशा वाचनांमुळेच देशहितासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असा ते मनाशी ठाम निर्णय करू शकले. बॅरिस्टर होऊन भारतात परतले. अलाहाबाद या उच्च न्यायालयात वकिली करू लागले. लवकरच त्यांचा विवाहदेखील झाला. कमलदेवी कौल या त्यांच्या धर्मपत्नी. कालांतराने त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव ठेवले प्रियदर्शिनी इंदिरा. ही प्रियदर्शिनी म्हणजेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होय.
लखनौच्या काँग्रेस अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांची महात्मा गांधीजींशी भेट झाली. गांधीजींच्या विचारांचा प्रभाव निश्चितच त्यांच्यावर पडला. गांधीजींच्या व्यक्तिमत्वाने ते प्रभावित झाले. ते गांधीजींचे परमभक्त व लाडके शिष्य बनले. सन १९२९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. भारतमातेची पारतंत्र्यातून मुक्तता करणे हे एकमेव उद्दीष्ट उराशी बाळगून त्यांनी भारतीय राजकारणात प्रवेश घेतला. अनेक निदर्शन, आंदोलन, सत्याग्रह करीत त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. पंडित नेहरू यांच्या पत्नी कमलादेवी यांनीही पतीबरोबर राजकारणात थोडाफार सहभाग घेतला होता. त्याचे परिणाम म्हणून इंग्रज सरकारने त्यांनाही तुरुंगाचा मार्ग दाखवला. पंडित नेहरूंना तर इंग्रज सरकारने कुठे सत्याग्रह केल्याबद्दल सरकारविरोधी भाषण केल्याबद्दल तर कुठे सरकारविरोधी लेख लिहिल्याबद्दल सतत तुरुंगात टाकले होते. इंग्रज सरकार म्हणजे एक फसवी आणि लबाड जमात, असा अनुभव त्या वेळी आपल्या नेत्यांना आला होता आणि हिताच्या दृष्टीने सायमन कमिशन इंग्लंडवरून भारतात येत आहे, अशी प्रसिद्धी त्यांनी केली; परंतु आपले सर्व नेते इंग्रजांच्या लबाड्या जाणून होती. त्यांनी सायमन कमिशनविरोधात अनेक नेत्यांनी निदर्शने केली. "सायमन गो बॅक" म्हणत त्यांना भारतीय जनतेने कडवा बिरोध केला. यात पंडित नेहरूंनी पुढाकार घेतला होता. या निदर्शनामध्ये इंग्रजांनी केलेला लाठीहल्ला अनेकांना सहन करावा लागला. त्यात पंडित नेहरूंनाही हा मार सहन करावा लागला.
१९४२ मधील 'चलेजाव' आंदोलनात पंडित नेहरूही अग्रस्थानी होते. इंग्रज सरकारने त्यांना अहमदनगरच्या तुरुंगात टाकले. तेथेच त्यांनी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा भारताच्या इतिहासाची परिपूर्ण माहिती देणारा अनमोल असा ग्रंथ लिहिला. सर्व थोर नेत्यांच्या कठोर प्रयत्नाने भारताची जनता स्वातंत्र्याचे स्वप्न पाहू लागली होती. काळ स्वातंत्र्याच्या दिशेने झपाझप पावले टाकू लागला में होता. रँडसाहेब, जॅक्शन, वायली साहेब यांच्यासारख्या कणखर इंग्रज अधिकाऱ्यांना भारतीय क्रांतिकारकांनी यमसदनी पाठवले होते. जनतेचा प्रक्षोभ पाहून इंग्रज सरकार हादरले होते आता आपला हेका सोडला नाही तर ही स्वातंत्र्याच्या वेडाने झपाटलेली भारतीय जनता आपल्याला मातीमोल केल्याशिवाय राहणार नाही याची त्यांना जाणीव झाली. १९४८ मध्ये ९ ऑगस्टला इंग्रजांना 'चलेजाव' असा इशारा गांधीजींनी दिला. "चलेजाव" म्हणजे इंग्रजांनी आपला बोरीबिस्तरा गुंडाळून भारत सोडून निघून जावे व भारताला स्वातंत्र्य द्यावे, हाच तो संदेश होता. यात नेहरूदेखील सहभागी होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताची फाळणी झाली. भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे जन्मास आली आणि सर्वानुमते पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. स्वतंत्र भारताच्या अनेक समस्या म्हणजेच अज्ञान, बेकारी, दुष्काळ, शेतीविकास, वैज्ञानिक प्रगती या सर्व गोष्टी नेहरूंनी अत्यंत हुशारिने हाताळल्या आणि भारताला प्रगतशील राष्ट्र बनविण्याच्या उद्देशाने मार्गक्रमण केले. भारताला स्वतंत्र आणि समृद्ध कारण्यात पंडित नेहरूंचा सिंहाचा वाटा होता.
लहान मुले आणि युवा पिढी म्हणजे देशाचं उज्वल भविष्य. त्यांची शैक्षणिक, सामाजिक प्रगती व्हावी म्हणून ते सतत कार्यरत राहिले. पंडित नेहरूंना गुलाबाची फुले खूप आवडत आणि गुलाबाच्या फुलांसारखीच भासणारी लहान मुलंही त्यांना खूप आवडत. म्हणूनच त्यांना फुलामुलांचे नेहरू म्हणत. लहान मुलांचे ते चाचा होते. त्यांना लहान मुले चाचा नेहरू म्हणूनच ओळखतात. १४ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस 'बालदिन" म्हणूनच साजरा केला जातो. १९५२ साली पंडितजींना 'भारतरत्न' हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. त्यांनी तब्बल १८ वर्षे देशाचे पंतप्रधानपद भूषविले. देशातील सर्व लहान मुलांना प्रिय असलेले चाचा नेहरू एक दिवस देवालाही प्रिय झाले. पंडित जवाहरलाल नेहरू २७ मे १९६४ रोजी आपल्यातून निघून गेले. ते गेले; परंतु त्यांचे कार्य भारतातील प्रत्येक तरुणाला प्रेरणादायी ठरेल असेच आहे.