नेताजी सुभाषचंद्र बोस
इंग्रजांची हुकुमशाही न जुमानता त्यांना प्रखरतेने शह देणारे आपल्या पराक्रमाने इतिहासात अजरामर झालेले थोर लढवय्ये म्हणजेच सुभाषचंद्र बोसं. त्यांच्या स्वातंत्र्यप्रेमाच्या विचारांनी आणि इंग्रजांशी दोन हात करून आपला देश स्वतंत्र करण्याच्या विचारांनी तमाम भारतीय जनतेचे रक्त सळसळायचे !
सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे झाला. जानकीदास हे त्यांचे वडील आणि आई प्रभावतीदेवी. आपल्या शालेय जीवनापासूनच सुभाषबाबूंची देशभक्तीकडे ओढ होती. कोलकता विद्यापीठात त्यांनी पदवी प्राप्त केली आणि ते आय.सी.एस.ची परीक्षा देण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले त्या ठिकाणी त्यांनी परीक्षेत भरघोस यश मिळवले. अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत अभ्यास करून ते आय.सी.एस. परीक्षेत चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
इंग्लंडहून भारतात परत आल्यानंतर सनदी अधिकारी म्हणून इंग्रज सरकारची नोकरी त्यांना प्राप्त झाली. त्याच दरम्यान महात्मा गांधींनी इंग्रजी जुलुमशाहीच्या विरोधात असहकाराची चळवळ सुरु केली होती. या चळवळीतील एक भाग म्हणजे सरकारी नोकरीचा त्याग करणे असा होता. महात्मा गांधीच्या स्वातंत्रप्रेमी विचारांनी सुभाषचंद्र बोस प्रभावित झाले. त्यांनी आवाहनाला प्रतिसाद दिला आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनात उडी घेत त्यांनी अत्यंत मानाच्या नोकरीचा त्याग केला.
स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी आपल्या नोकरीचा त्याग करणारे ते पहिले आय.सी. एस. अधिकारी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यात त्यांनी हीरीरिने सहभाग घेतला. अनेक सभा त्यांनी जिंकल्या. जनतेच्या मनात स्वातंत्र्याची मशाल पेटविली. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जनता निर्भिड बनू लागली. इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारू लागली. सुभाषचंद्राची भाषणे म्हणजे पेटते निखारे होते. त्यांच्या भाषणाने युवकवर्ग तर पेटूनच उठायचा. त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी इंग्रज हतबल झाले होते.
स्वातंत्र्याच्या ठिणग्या ठिकठिकाणी पेटू लागल्या होत्या. कोलकता महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी क्रांतिकारकांशी संबंध ठेवल्याच्या आरोपावरून इंग्रज सरकारने त्यांना अटक केली आणि मंडालेच्या तुरुंगात त्यांची रवानगी केली. तब्बल तीन वर्षांनी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सुभाषबाबूंनी तरुणांच्या संघटना उभ्या केल्या. सुभाषचंद्र आणि पंडित नेहरू या दोन युवा नेत्यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली होती.
या दोन युवा नेत्यांनी जनतेला मार्गदर्शन केले. अनेक तरुणांना स्वातंत्र्यलढयात सामील करून घेतले. काँग्रेसने इंग्रज सरकारशी कसल्याही तडजोडी न करता संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करावी, असे त्यांचे मत होते; परंतु गांधीजींची तडजोडवादी भूमिका त्यांना अजिबात पटली नाही. गांधीजींचे आणि सुभाषबाबुंचे वैचारिक मतभेद होते.
पुढे त्यांनी काँग्रेसला राजीनामा दिला आणि 'फॉरवर्ड ब्लॉक' नावाचा पक्ष काढला. काँग्रेसने इंग्रज सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन सुरू करावे असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना इंग्रजांनी अंतर्गत सुरक्षा कायद्यासाठी अटक केली. त्यातून त्याची लवकर सुटका झाली; परंतु त्यांच्या हालचालींवर कडक पहारा ठेवण्यात आला. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. या नजरकैदेतून मोठ्या शितफ़िने सुभाषचंद्र बाहेर पडले.
वेष बदलून ते गुप्तपणे बाहेर पडले आणि थेट जर्मनीत गेले. तेथे त्यांनी हिटलरसह काही प्रमुख जर्मन नेत्यांच्या भेटी घेतल्या. भारतातील जनतेच्या स्वातंत्र्यलढ्याला जर्मनीने सहकार्य करावे म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले. जर्मनीत त्यांनी 'इंडियन इंडिपेन्डन्स लीग' या नावाची संस्था स्थापन केली.
जर्मनीमधून सुभाषचंद्र बोस जपानला गेले. जपानकडून या स्वातंत्र्यलढ्याला काही मदत होते का, याची त्यांनी चाचपणी केली. जपानने सुभाषचंद्रांना मदत करण्याचे मान्य केले. त्यांनी रेडिओवरून भारतीयांना स्वातंत्र्यलढ्यात उतरण्याचे आवाहन केले. त्यांनी 'आझाद हिंद सेना' स्थापन केली. नेताजींनी भारतात या सेनेची अनेक पथके तयार केली.
तरुणांना भारतीय स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेण्याचे भावनिक आवाहन नेताजींनी केले आणि कार्य आश्चर्य भारताची युवापिढी स्वातंत्र्यासाठी त्यांच्या सेनेत यायला एका पायावर तयार झाली." तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूंगा" या त्यांच्या काळजाला भिडणाऱ्या शब्दांनी भारतीय तरुणाला स्फुरण चढायचे. 'बचेंगे तो और भी लढेंगे लेकिन आझादी लेकर ही रहेंगे' असा मनाशी निर्धार करत अखंड भारत इंग्रजांशी टक्कर द्यायला सज झाला.
नेताजी हिंद सेनेचे सरसेनापती झाले. सैनिकांनी त्यांना नेताजी ही पदवी बहाल केली. तेव्हापासून सुभाषचंद्र बोस यांना नेताजी सुभाषचंद्र बोस असे संबोधले जाऊ लागले. सुभाषचंद्रांनी 'चलो दिल्ली', 'जय हिंद' अशी घोषणा केली. आझाद हिंद सेनेच्या सहकार्याने ब्रिटिशांचा पराभव करून आपली मायभूमी गुलामीतून मुक्त करायची असे त्यांचे स्वप्न होते, पण त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. १८ ऑगस्ट १९४५ रोजी ते ज्या प्रवास करत होते त्या विमानाचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्या महान नेताजीस कोटी कोटी प्रणाम !