सच्चा साथीदार | Saccha Sathidar | Akbar Birbal Story in Marathi

सच्चा साथीदार


बादशहाच्या दरबारात बिरबलाची छाप दिवसेंदिवस अधिक पडत आहे हे पाहून काही दरबारी त्याचा द्वेष करू लागले. बिरबलाची कशा ना कशा रीतीनं कशी फजिती करायची याबाबतच ते विचार करू लागले. अखेरीस त्यांना एक युक्ती सुचली. 

आपल्या या बनावात त्यांनी बादशहाला सामील करून घेण्याचं ठरवलं. त्यांनी त्याला नुसतं सांगितलं, "जहाँपनाह, आपण बिरबलाला कसोटीला लावून पाहू या. यावेळी तो नक्कीच हरेल !"


"पण त्याची परीक्षा कशी घेणार?" बादशहानं त्यांना विचारलं.

विघ्नसंतोषी दरबाऱ्यांनी मग आपली क्लृप्ती बादशहाला सांगितली आणि बादशहानं हसून होकारार्थी मान हलवली. तो फक्त एवढंच म्हणाला, "मला खात्री आहे, त्याही प्रसंगातून बिरबल सहीसलामत बाहेर पडेल !"


दुसऱ्या दिवशी बिरबल दरवारला येण्यापूर्वी बादशहानं आपल्या डझनभर दरवाऱ्यांना प्रत्येकी एक एक अंडे देऊन ते आपल्या अंगरख्यात लपवून ठेवण्यास सांगितलं. त्या अंड्याचं काही करायचं हे त्या साऱ्यांना अगोदरच माहिती होतं. काही वेळानं बिरबल दरबारात आलेला पाहिल्यावर बादशहा साऱ्यांना उद्देशून म्हणाला, "एका पीरानं काल रात्री माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं की तुझ्या बागेतल्या हौदात बुडी मारून जो कोंबडीचं अंडं बाहेर काढील, तो तुझा सच्चा साथीदार आहे असं समज, आज मला साऱ्यांची परीक्षा घ्यावयाची आहे, तुम्ही साऱ्यांनी आता आळीपाळीनं हौदात बुडी मारा आणि आपली स्वामी भक्ती सिद्ध करा. "


बादशहाची ही आज्ञा ऐकताच एका मागून एक साऱ्या दरबाऱ्यांनी बागेतल्या हौदात उडी मारली आणि बादशहानं, अगोदरच ठरवल्याप्रमाणं त्यांना दिलेलं कोंबडीचं अंड हौदातून बाहेर काढल्यासारखं करून बादशहाच्या हाती दिलं. अखेरीस बिरबलाची पाळी आली.


बिरवलानंही हौदात बुडी मारली, पण त्याला काही एखादं अंडं तिथं मिळालं नाही. बिरबलाच्या डोक्यात चटकन् प्रकाश पडला. तो लगोलग हौदातून बाहेर पडला आणि 'कुकूऽ रेऽ कुकू' असं ओरडत बादशहासमोर येऊन उभा राहिला.

बिरबलाच्या अखंडित आरवण्यानं हवालदिल झालेल्या बादशहानं त्याला विचारलं. "काय रे बिरवल, बाकी साऱ्या दरबाच्यांनी हौदात. बुडी मारून अंडी आणली तू कसं आणलं नाहीस?"


बिरबलानं पटकन उत्तर दिलं, "सरकार, मी कसं अंडं आणणार? अंडी कोंबड्या घालतात. पण मी तर कोंबडा आहे. माझ्याकडं अंडं कसं मिळणार? कुकूड रेऽ कुकू !" बादशहा काय समजायचं ते समजला. सारे दरबारी मात्र हिरमुसले होऊन खाली पाहत राहिले.

Post a Comment (0)
Previous Post Next Post