प्रश्नोत्तरे | Prashnottare | Akbar Birbal Story in Marathi

प्रश्नोत्तरे


एखाद्या दिवशी बादशहाला अशी एकदम लहर येई आणि तो बिरबलावर प्रश्नांची अशी काही सरबत्ती करी, की केवळ बिरबलच तिला तोंड देऊ शकत असे. 

शिवाय बादशहाची अशी अपेक्षा असे, की आपण विचारलेल्या वाट्टेल त्या प्रश्नांची बिरबलानं दिलेली उत्तरं केवळ मार्मिकच असायला हवीत असंच नव्हे, तर ती त्यानं क्षणाचाही विलंब न लावता द्यायला हवीत.


अर्थात हे काम अवघड होतं. तथापि बादशहाच्या ह्याही कसोटीला बिरबल पूर्णपणे उतरला होता. बादशहा आणि बिरबल या दोघांत झालेली अशा प्रकारची काही प्रश्नोत्तरे पुढं दिली आहेत.


बादशहा –  जगाचे आयुष्य किती?

 बिरबल  – आपल्या मरणापर्यंत.


बादशहा –  मूर्ख माणूस कशावरून ओळखावा?

 बिरबल –  त्याच्या बोलण्यावरून.


बादशहा – वाऱ्यापेक्षा वेगवान वस्तू कोणती ?

 बिरबल – मन.


बादशहा – सगळ्यात उत्तम हत्यार कोणते ?

 बिरबल – अक्कल.


बादशहा – कधीही नाश न पावणारी गोष्ट कोणती ?

 बिरबल – कीर्ती.


बादशहा – कोणाचीही न झालेली आणि न होणारी स्त्री कोणती ?

 बिरबल – पृथ्वी.


बादशहा – सगळ्यात उत्तम धंदा कोणता?

 बिरबल – शेतीचा.


बादशहा – सुखी राहायचा मार्ग कोणता ?

 बिरबल – संतोषी तो सदा सुखी.


बादशहा – बलवान कोण?

 बिरबल – वेळ.


बादशहा – खरा साक्षीदार कोण?

 बिरबल – माणसाचं स्वत :चं मन.


बादशहा – जवळजवळ राहणाऱ्या पण कधीही न भेटणार्या दोन वस्तू कोणत्या?

 बिरबल – डोळे.


बादशहा – सगळ्यात मोठा दात कोणता ?

 बिरबल – नांगराचा.


बादशहा – सूर्यचंद्राचा प्रकाश न पाहू शकणारा कोण?

 बिरबल – आंधळा.


बादशहा – सर्वथैव अजिंक्य असा वैरी कोण?

 बिरबल – मृत्यु.


बादशहा – सर्वात नीच कोण?

बिरबल –  देशद्रोही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post