देव भक्तासाठी स्वत: का धावतो ? | Dev Bhaktansathi Swataha Ka Dhavto | Akbar Birbal Story in Marathi

देव भक्तासाठी स्वत: का धावतो?


त्या दिवशी दिल्लीत मोठ्या प्रमाणावर मोहरमचा सण साजरा करण्यात येता होता. बादशहाही खुष होता. धार्मिकही होता. इतर धर्माचाही अभ्यास त्याचा चांगला होता. म्हणूनच त्यानं बिरबलला आपल्या महालात पाचारण करून विचारलं, "बिरबल, आम्ही वाचलंय की तुम्हा हिंदुंचा एक देव, एका हत्तीची विनवणी ऐकून त्याच्या मदतीला धावला होता. खर आहे ?"


"अगदी खरं, सरकार," बिरबलानं उत्तर दिलं, "गजेंद्राचा धावा ऐकून स्वतः भगवान विष्णू त्याच्या मदतीला धावून गेले होते."


"ते सारं ठीक," बादशहा संमतीदर्शक मान हलवत पुढं म्हणाला, "पण मला एक गोष्ट समजत नाही, खुद्द भगवान विष्णूनं हे सारं स्वतः करायची काय जरूरी होती? त्यानं आपल्या एखाद्या सेवकाला पाठवलं असतं तरी चालण्यासारखं होतं. स्वत :च जायची काय गरज होती. आपल्या जवळच्या एखाद्या नोकराकरवी तो हे काम करून घेऊ शकला असता ! मग त्यानं स्वत:च का एवढी तसदी घेतली? "


"सरकार, आपल्या ह्या सवालाचा जबाब नंतर कधी तरी मी देईन," बिरबल त्यावेळी म्हणाला.

बादशहा यावर काही बोलला नाही. बिरबलाला ठाऊक होतं. बादशहाचा एक अत्यंत विश्वासू हुजऱ्या छोट्या राजपुत्राला घेऊन रोज बादशहाला भेटायला येत होता. 

मोठ्या युक्ती-प्रयुक्तीनं बिरबलानं त्या हुजऱ्याला आपलंसं केलं आणि एका अत्यंत गुप्त बाबतीत त्याची मदत मागितली प्रथम जरी तो बादशहाच्या भीतीमुळे बिरबलाच्या योजनेत भाग घ्यावयास तयार नव्हता, तरी अखेरीस साऱ्या गोष्टींची जबाबदारी बिरबलानं आपल्या डोक्यावर घ्यायचं त्याला वचन दिल्यामुळे हुजया बिरबलाच्या मसलतीत सामील झाला. 


काही दिवसातच बिरबलानं हुबेहूब छोट्या राजपुत्रासारखा दिसणारा एक मेणाचा पुतळा तयार करून घेतला आणि त्याला राजपुत्राचेच सारे कपडे व दागिने घालून बिरबलानं हुजन्याला सांगितलं, "या पुतळ्याला बरोबर घेऊन नेहमीप्रमाणं तू बादशहाच्या समोरून जा आणि पाय घसरल्याचं निमित्त करून, राजवाङ्यासमोरच्या बागेतल्या कारंजात पड."


हुजऱ्यानं बिरबलानं सांगितल्याप्रमाणं सारं केलं आणि दुसऱ्या क्षणीच हलकल्लोळ उडाला, की राजपुत्र कारंजात पडला. बादशहानं हे ऐकले मात्र, तो दरबार सोडून तात्काळ धावला आणि कारंजात उडी मारून त्यानं त्यात पडलेल्या राजपुत्राला म्हणजेच त्या मेणाच्या पुतळ्याला बाहेर काढला.


नेमका ह्याच वेळी बिरबल त्या जागी हजर झाला आणि बादशहाला त्यानं विचारलं, "सरकार, कारंजात आपण स्वत: उडी मारायची काय जरूरी होती? आपल्याकडे कुणी नोकरचाकर नव्हते का?"


बिरबलाच्या प्रश्नाचा रोख बादशहाच्या तात्काळ लक्षात आला. ही संधी साधून बिरबल म्हणाला, "खाविंद, आपलं जसं आपल्या मुलांवर प्रेम असतं, तसंच भगवंताचंही आपल्या भक्तांवर असतं. म्हणूनच तो स्वतः त्यांच्या मदतीला धावून जातो."


"खरं आहे तुझं म्हणणं, बिरबला," बादशहा म्हणाला, "मला त्याचा प्रत्यक्ष पुराबाच दाखवलास." तथापि बादशहा आपल्या हुजयावर, त्याच्या या गैरवर्तणुकीबद्दल चिडला. तेव्हा बिरबलानं त्याला शांत करत म्हटलं, "सरकार, साऱ्या प्रकाराला मी जबाबदार आहे. तेव्हा जी काही शिक्षा करायची आहे ती त्या हुजन्याला न करता, मला करावी !"


बिचारा बादशहा यावर काय बोलणार? बिरबलानं त्याला अगोदरच निरुत्तर केलं होतं.

Post a Comment (0)
Previous Post Next Post