घडाभर अक्कल | Ghadabhar Akkal | Akbar Birbal Story in Marathi

घडाभर अक्कल


पुन्हा एकदा बादशहाची बिरबलावर कारणावश खप्पा मर्जी झाली. परिणामी बिरबल एका अज्ञात गावी जाऊन राहिला. दिल्ली सोडून विरबलाला काही दिवस झाले असतील-नसतील, तेवढ्यात अन्य एका राजाकडून खलिता आला आणि त्यात लिहिलं होतं, "कृपया घडाभर अक्कल पाठवावी."


मांडलिक राजाची ही मागणी वाचून बादशहाला काय करावं हे समजेना. त्यानं तो खलिता आपल्या दरबारापुढं ठेवला, पण त्याला काय उत्तर पाठवावं हे मात्र कुणीही दरबारी सुचवू शकला नाही.


आता मात्र बादशहाला बिरबलाची गैरहजेरी चांगलीच जाणवली. पण त्याचा पत्ता कुणालाच माहीत नसल्यामुळे त्याला शोधून काढण्यासाठी बादशहानं एक युक्ती रचली.


बादशहानं मग आपल्या अधिपत्त्याखालील साऱ्या गावच्या मुख्यांना एक-एक मेंढा पाठवून कळवलं की, त्या प्राण्याच्या निर्वाहाकरिता गाव प्रमुखानं सरकारी खजिन्यातून पैसे घ्यावेत आणि मेंढ्याला स्वतःजवळ ठेवून, त्याच्या वजनात काहीही बाढ किंवा घट न करता महिनाभरानं परत करावा.


बिरबलाच्या कानी ही गोष्ट आली तेव्हा त्यानं ओळखलं आपल्याला शोधून काढण्याकरिता हा डाव खेळला होता. म्हणूनच, तो ज्या गावात गुप्तपणं राहात होता त्याच्या मुख्याकडें जाऊन तो म्हणाला, "पाटीलबुवा, तुम्ही इतके दिवस मला आपल्या गावात लपून राहायची परवानगी दिल्याबद्दल मोबदल्यात मला आपल्याला एक विनंती करावयाची आहे. बादशहाकडून आपल्याकडं एक मेंढा आलाच आहे ?"


"होय. गाव-प्रमुखानं मान हलवली.

"आणि त्याला सरकारी पैशानं चांगलं खायला-प्यायला घालून, त्याचं वजन मुळीच कमी-अधिक न करता, महिनाभरातनंतर बादशहाकडं परत पाठवायचा आहे. खरं ना?"


"अगदी बरोबर !"

"मग हे कसं काय तुम्ही साधणार आहात?"


"तीच तर पंचाईत आहे, " गावप्रमुख निरुत्साही होत म्हणाला. "तो मेंढा आल्यापासून तर माझी झोपच उडाली आहे. काय करावं तेच कळेनासं झालं आहे !"

"मग मी सांगतो तसं करा," बिरबल म्हणाला, "तुम्ही त्या मेंढ्याला नियमितपणे चारा-पाणी घाला, म्हणजे त्याचं वजन कमी व्हायचं नाही." 

"ते ठीक पण त्यामुळे त्या मेंढ्याचं वजन वाढत जाईल. त्याचं काय ?" गावप्रमुखानं विचारलं.


"सांगतो तेही," बिरबलानं आश्वासन दिलं, "मेंढ्याला खायला घालून झालं, की त्याला वाघाच्या पिंजऱ्यासमोर नुसता उभा करायचा म्हणजेच मग आपोआपच वाढलेलं त्याचं सारं बजन कमी होईल !"


"वा ! नामी युक्ती !" गावप्रमुखानं आनंदातिशयानं उद्गारला, आणि मग गावप्रमुखानं विरवलाच्या सल्ल्याप्रमाणं सारं काही केलं. महिनाभराच्या मुदतीनंतर बादशहानं पाठवलेला मेढा गावप्रमुखानं पुन्हा त्याच्याकडे पाठवून दिला.

बादशहानं साऱ्या गावप्रमुखांकडून आलेल्या मेंढ्चयांची कसून तपासणी केला तेव्हा त्याला आढळलं, त्या साऱ्या प्राण्यांत एकच असा होता, की ज्याचं वजन कमी-अधिक मुळीच झालेलं नव्हतं !


बादशहानं तात्काळ ओळखलं बिरबलच त्या साऱ्या प्रकारमागं असावा. त्यानं त्या मेंढ्याच्या गावप्रमुखाला बोलावून घेतलं आणि त्याला सत्य सांगायला सांगितलं, तेव्हा त्या क्लृप्ताचा कर्ता बिरबलच होता हे त्याने कबूल केलं.


तात्काळ, बिरबलाला इतमानानं परत आणण्याकरिता बादशहानं मोठा लवाजमा पाठवला आणि तो तसा दरबारात हजर झाल्यावर, बादशहानं त्याच्या पुढ्यात घडाभर अकलेची मागणी करणारं आपल्या मांडलिक राजाकडून आलेलं पत्र ठेवलं. 


बिरबलानं पत्र वाचलं आणि बादशहाला आश्वासन दिलं, की महिनाभरात घडाभर अक्कल त्या राजाला पाठवून देतो ! बिरबलानं नंतर भोपळ्याचा एक वेल आणवला आणि तो एका गोल मडक्यात वाढत ठेवला. काही दिवसातच त्या वेलाला एक छोटा भोपळा आला आणि तो मडक्यात पूर्ण भरून, बाहेर काढता येईना तेव्हा मग बिरबलानं उरलेला वेल तोडून टाकला.


त्या मडक्याचं तोंड कापडानं घट्ट बांधून, बंद करून ते मडकं घेऊन बिरबल बादशहाकडे आला आणि म्हणाला, "सरकार, घडाभर अक्कल या मडक्यात आहे. आता आपण हा घडा त्या राजाकडं पाठवण्याची व्यवस्था करावी आणि बरोबरच्या चिठ्ठीत लिहावं, "आपण मागणी केलेली घडाभर अक्कल सोबत पाठवत आहे. फक्त अट एकच, की हा घडा न फोडता किंवा त्याच्यातील अकलेचा भुगा न करता ती अलगद बाहेर काढावी आणि आमचा घडा आम्हाला नीट परत करावा. घडा फुटला किंवा आतल्या अकलेचे तुकडे झाले तर मग मात्र आमच्याकडं चाळीस हजार मोहरा पाठवाव्या लागतील किंवा लढाईला तयार असावं."


घडाभर अकलेची मागणी करणाऱ्या मांडलिक राजाच्या हातात ते पत्र सोबत पाठवलेल्या धड्यासकट पडलं तेव्हा तो पुरता समजून चुकला, की बादशहाच्या दरबारातल्याच कुणा अक्कलवंत माणसाचं हे कृत्य असाव. म्हणूनच तो ताबडतोब बादशहाला शरण गेला आणि त्यानं त्याची माफी मागितली.


बादशहानं त्याच्यावर दया केली, पण त्यानं त्या मांडलिक राजाला सांगितलं, "तुला घडाभर अक्कल पाठवायची युक्ती करणाऱ्या बिरबलाला तू शरण जा.

" मांडलिक राजानं तात्काळ बिरबलाचे पाय धरले. बिरबलानं त्याला उठवलं आणि सुहास्य मुद्रेनं त्याला निरोप दिला.

Post a Comment (0)
Previous Post Next Post