काठीनंच चोर पकडून दिला | Kathinach Chor Pakadun Dila | Akbar Birbal Story in Marathi

काठीनंच चोर पकडून दिला


एक सावकार दरबारात हजर राहून गदगदलेल्या स्वरात बादशहाला सांगत होता., "बादशहा सलामत, माझ्या घरातील शंभर मोहरांची एक थैली नाहिशी झाली आहे. चोर माझ्या घरातल्याच चार नोकरांपैकी एक असावा त्याबाबत मला मुळीच संशय नाही. आपण काहीतरी करून चोर शोधून काढून माझा ऐवज मला परत मिळण्याची व्यवस्था केल्यास मी आपला जन्मभर ऋणी होईन."


बादशहानं हा मामला बिरबलाकडे सोपवला.


बिरबलानं त्या चारही नोकरांना बोलावून प्रत्येकाला सारख्याच उंचीची काठी देत म्हटलं, "तुम्ही या काठ्या आपापल्या घरी घेऊन जा आणि उद्या सकाळी त्या काठ्या घेऊन परत माझ्याकडे या. या अवधीत ज्याची काठी तीन अंगळांनी मोठी होईल त्यालाच मी चोर समजेन."


चारी नोकर काठ्या घेऊन आपापल्या घरी परतले. त्यांच्यापैकी जो खरा चोर होता त्यानं घरी पोहोचल्याबरोबर आपल्याला दिलेल्या काठीचा तीन अंगळे भाग ताबडतोब कापून टाकला. उद्देश हा, की यदाकदाचित काठी वाढली तरी ती तिच्या मूळ लांबीपेक्षा जास्त मोठी होऊ नये !


दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे ते चौघे नोकर आपापल्या काठ्या घेऊन बिरबलाकडे आले.


बिरबलानं त्यांच्या काठ्या मोजल्या तेव्हा त्याला आढळलं की त्या चौघांपैकी फक्त एकाची काठी तीन अंगळांनी कमी झालेली होती ! 

बिरबलानं त्याला आपल्या खोलीत बसवून ठेवून इतर तिघांना जाण्यास सांगितलं. ते तिघं गेल्यावर बिरबलानं त्या चौथ्याला खडसावून विचारलं आणि जबर शिक्षेची धमकी दिली. तेव्हा त्यानं आपला गुन्हा कबूल केला. त्यानं मग निमूटपणं शंभर मोहरांची पिशवी आणून बिरबलाच्या स्वाधीन केली. 


बिरबलानं सावकाराला बोलावून त्याच्या स्वाधीन ती पिशवी करत सांगितलं, शक्य झाल्यास त्यानं त्या नोकराला, त्याचा हा पहिलाच अपराध असल्यामुळे क्षमा करावी."

शंभर मोहरांची हरवलेली पिशवी परत मिळालेल्या सावकारानं बिरबलाची ही सूचना मान्य केली आणि त्याचे गुणगान करत तो घरी परतला.

Post a Comment (0)
Previous Post Next Post