हंस हा कुणाचा
लागला अचानक एका हंसाला बाण
धरणीवरी कोसळला घायाळ तो हैराण
थरथरतो धडपडतो स्व वाचवाया प्राण
तळमळतो विव्हळतो जीव तो लहान
हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा
हंस हा कुणाचा.....
युवराज सिद्धार्थाने हंसाला पाहिले
त्याक्षणी त्याठिकाणी ते धावूनी गेले
उचलीले लगबगीने त्या पाणी पाजिले
हळूच बाण काढूनी औषध लाविले
इतक्यात देवदत्त चुलत भाऊ तो आला
सिद्धार्थाकडे पाहूनी त्या राजहंसाला
शिकार आहे माझी दे हंस तो मला
धनी मी आहे त्याचा मीच बाण मारिला
हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा
हंस हा कुणाचा......
अरेरेरे देवदत्ता तू काय हे केले
मुक्या जीवाला मारून तू काय साधिले
बघ मृत्यूच्या जबड्यातूनी मी त्याला सोडिले
त्वा मारिले परंतु मी त्यालाच रक्षिले
उपदेश हा मला तू नको शिकवू गौतमा
मला हे तत्त्वज्ञान नको सांगू गौतमा
शिकार करणे क्षत्रियांचा धर्म गौतमा
माझ्या शिकारीवर माझा हक्क गौतमा
हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा
हंस हा कुणाचा.....
वादाने वाद दोघात अधिक पेटला
प्रश्न तो अशक्य सुटेनासा वाटला
मग राजापुढे जाऊनी हा प्रश्न मांडिला
म्हणती या दरबारात द्या न्याय हो मला
शुद्धोदन राजाने विचार करुनी
ठाम निर्णय न्यायाचा टाकिला देऊनी
मारणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ तारणारा धनी
हा हंस सिद्धार्थाचा सांगितले पटवूनी
हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा
हंस हा कुणाचा.....
सिद्धार्थाने हंसाला त्या जीवदान दिले
भयभीत विहंगाला त्या मुक्त सोडिले
भरारी घेत स्वैर ते गगनास उडाले
किती हो समाधान गौतमास लाभले
समता बंधुभाव शांती करुणासागर
गौतम बुद्ध धन्य जगी झाले अजरामर
ते धम्मज्ञान भूषण क्रांतीचे आगर
कुंदन करी वंदन दोन्ही जोडूनिया कर
हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा
हंस हा कुणाचा.....