विहारात जाऊ
विहारात जाऊ आणि लग्न लावू
नव्या संगमाची नवी रीत पाहू
जुन्या जीवनाची इतिश्री करूनी
रूढी बंधनाच्या सीमेपर जाऊ।।
घडी गळसरीची मागणी नसावी
शहाणी अशी मंडळी ती असावी
मानपान हुंडा गळ्यातील धोंडा
सोयरेपणाचे उगी दोष दावू।।
शुभ्र वस्त्रधारी वधू अन् वराची
जन्मगाठ पाहू नदी सागराची
सुटाला बुटाला जरीपातळाला
सोहळ्या मधूनी पिटाळून लावू।।
जेवण कशाला अशा सोहळ्याला
उधारीमुळे फास लागे गळ्याला
खाणे लाडवाचे पोट गाढवाचे
मंडपी कशाला असे खूप खाऊ।।
पोरगी गुणाची पोरगा गुणाचा
असता मध्ये अडथळा हा कुणाचा
असे लग्न व्हावे विना कर्ज होता
वामन परि का उगी दोष दावू।।