चकित जाहले अंबर
चकित जाहले वरती अंबर, नजर तयाची खिळली भूवर
म्हणे कुणाचे आज स्वयंवर, पडला मंडप अवघा भूभर
नभांगणाहून नटले भू-वन, पुनवेचेही गेले मीपण
चंद्र लाजला, लपू लागला, असा सोहळा भूमिवरी आजला ।।धृ।।
दिन भाग्याचा आज दीनांचा
जन्म-दिन हा माझ्या भीमाचा
आनंदाचा समय सणाचा
रंग बदला या भुवनाचा
वारा रंगला, नाचू लागला, असा सोहळा..।।१।।
दीप मंडपी झगझगणारे
या तेजाने दिपले तारे
म्हणती खाली पाहू नका रे
आड ढगांच्या लपले सारे
बिजली बाईला, हेवा वाटला, असा सोहळा... ।।२।।
भक्त गणांची गणती नाही
दूर दुरूनी आले पायी
धन्य भीमा हे तव अनुयायी
श्रध्देला ह्या उपमा नाही
भावे पुजती राजा तुजला, असा सोहळा... ।।३।।
ज्याने जगाला जीवन द्यावे
का न जगाने त्यास पुजावे
घ्यावे तैसे परतून द्यावे मानव धर्म हाच स्वभावे
भीमही झिजला, त्याने गाजला, असा सोहळा... ।।४।।