◆ भीमाच्या नावा आधी
भीमाच्या नावा आधी नाव घेऊ भीमाईचं
भीमाच्या शेजारीच फोटो लाऊ रमा आईचं ।।धृ।।
आई भीमईनं, पाजला पान्हा
कष्ट रामाईनं साहिले नाना
कोमेजली काया कष्ट उपसतांना
पतीच्या सेवेमधी फूल सुकलं ना जाईचं ।।१।।
प्राणपती प्यारा परदेशी जाता
गवऱ्या थापायची घरी रमामाता
तरी गरिबीनं, ना झुकला ना माथा
पतीच्या पाठी तिनं शेण उपसलं गाईचं ।।२।।
नव्हती पितळेची, ताटी अन् वाटी
जर्मलची भांडी, स्वयंपाकासाठी
कुरबुरली नाही, कधी पतीसाठी
होतं घरटं तिचं, एक सन्याशीबाईचं ।।३।।
पुस्तकात वामन भीम सदा रमला
आणि तुझ्यासाठी जन्मभरी श्रमला
ज्ञान पिपासू तो नाही कधी दमला
एकच होत पिसं, लेखनी आणि शाईचं ।।४।।