आळशांचे राजे | Aalashanche Raje | Akbar Birbal Story in Marathi

आळशांचे राजे


बरेच दिवस बादशहाच्या मनात घोळत होतं, आपण जसे उद्योगी लोकांचं कौतक करतो. त्यांना मेजवान्या देतो, त्याचप्रमाणे आळशी लोकांच्याबाबत का काही करू नये? आळशांनाही चांगलं भोजन द्यावं. 

बादशहानं आपला हा इरादा बिरबलाला सांगितला. बिरबल म्हणाला.


"सरकारचा बेत चांगला आहे. आजतागायत आळशांच्याकरिता कुणी काही केलं नसेल ! आपण असं काही केलंत तर जगातील आळशांचे कैवारी समजले जाल !" "ठीक, तर मग आज राजधानीतल्या झाडून साऱ्या आळशांना गोळा करून आण बरं !" बादशहानं फर्मावलं. 


बिरबलानं तात्काळ शहरात दवंडी पिटवली, की बादशहा सलामत तमाम आळशांना मेजवानी देणार असल्यामुळे सायांनी राजवाड्यासमोरील पटांगणात दोन प्रहरी जमावे.


झालं. थोड्याच वेळात आळशांच्या झुंडीच्या झुंडी ठरलेल्या ठिकाणी येऊ लागल्या. त्या पाहून बादशहा बिरबलाला म्हणाला, "बिरबल, तुला वाटतं आपल्या राज्यात इतके आळशी असतील ! खरे आळशी यांच्यात अगदी थोडेच असतील. आता तू हयांच्यापैकी खरे आळशी कोण ते शोधून काढ."


बिरबलानं मग जमलेल्या साऱ्या आळशांना राजवाड्यासमोर उभारलेल्या कुडाच्या मंडपात बसायला सांगितलं. साऱ्या आळशांनी तसं करताच बिरबलानं दरबारी नोकराकरवी त्या मंडपाला आग लावली. आपण बसलेल्या मांडवाला आग लागल्याचं पाहताच, बहुतेक आळशी सैरावैरा पळून गेले. 

फक्त दोन आळशी मात्र आगीची इतकीशीही पर्वा न करता आरामात तिथंच पडून राहिले ! बिरबल मग त्या दोन आळशांना घेऊन बादशहाकडे आला आणि म्हणाला, "सरकार, हे घ्या आळशांचे राजे !"


बादशहानं मग त्या आळशांना भरपूर भोजन देऊन आपली मनीषा पूर्ण केली.

Post a Comment (0)
Previous Post Next Post