अस्तुरीच्या साडीवर शोभे पिंपळाच पान
आली जयंती जयंती
भिम माऊलीचा सण
अस्तुरीच्या साडीवर
शोभे पिंपळाच पान ।।धृ।।
पंचशिलेच्या रंगात
रंगलेली नवी धळी
पेटीमधुनी काढून
न्याहाळीते घडी घडी
सावळ्या मुखावर
उमटलं समाधान
अस्तुरीच्या साडीवर
शोभे पिंपळाच पान ।।१।।
निळ्या निळ्या झेंड्यावणी
सारे आसमंत निळे
भाऊ भावाच्या कपाळी
लावितात निळे टिळे
अंगणात पोरं पोरी
नाचतात आनंदानं
अस्तुरीच्या खाडीवर
शोभे पिंपळाच पान ।।२।।
ज्याच्या त्याच्या मुखावर
दिसे आनंदी आनंद
दरवळे चोहीकड़े
सारा सुगंधी सुगंध
जणू मोहरून आलं
वसंताच माळरान
अस्तुरीच्या साडीवर
शोभे पिंपळाच पान ।।३।।
या अशा शुभ दिनी
दिवे लागणीच्या वेळी
विहाराच्या अंगणात
वसुनिया लेकी बाळी
काशीनंदा सवे गाती
बुद्ध भिमाईच गाणं
अस्तुरीच्या साडीवर
शोभे पिंपळाच पान ।।४।।
आली जयंती जयंती
भिम माऊलीचा सण
अस्तुरीच्या साडीवर
शोभे पिंपळाच पान